मोदींच्या नव्हे तर पवारांच्या सभा घेणार का?
By admin | Published: October 6, 2014 12:52 AM2014-10-06T00:52:37+5:302014-10-06T00:52:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा
जावडेकरांची टीका: बाळासाहेब असते तर युती तुटली नसती
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा घ्यायच्या का? अशी टीका भाजप नेते व केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वन व पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केली. भाजप संपूर्ण बहुमत घेऊन राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जावडेकर यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत वरील मत व्यक्त केले. मोदींच्या राज्यातील प्रचार सभांवर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह इतरही काही पक्षांनी केलेल्या टीकेकडे जावडेकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मोदींच्या सभांवर आक्षेप घेणे हे एखाद्या संघाला त्यांच्या कर्णधाराशिवाय खेळण्याची अट घालण्यासारखा प्रकार आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोदी हे या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभा होणे स्वाभाविक आहे. भाजप मोदींच्या सभा घेणार नाही तर काय पवारांच्या सभा घेणार का, असा प्रतिसवाल जावडेकर यांनी यावेळी केला.
भाजपकडे स्थानिक नेतृत्वाची वानवा असल्याने मोदींचा वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे हा धोरणाचा नव्हे तर डावपेचाचा भाग आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी एक विशिष्ट नाव पुढे केले नव्हते. आताच हा प्रश्न का विचारला जातो? भाजपकडे या पदासाठी अनेक सक्षम नेते आहेत. निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जावडेकर म्हणाले. देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या पदरी अपयश आले. मात्र महाराष्ट्रात अशी स्थिती राहणार नाही. पोटनिवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढविल्या जातात तर सार्वत्रिक निवडणुका या राज्याच्या भविष्य ठरविणाऱ्या असतात. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडी सरकारला कंटाळलेली जनता मोदींच्या नेतृत्वात भाजपवर विश्वास व्यक्त करेल व पक्षाला बहुमत मिळेल. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतील. ‘राष्ट्र के साथ, महाराष्ट्र’ असे राज्यातील जनतेने मन तयार केले आहे, असे जावडेकर म्हणाले.संघाच्या दसरा कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्याचे त्यांनी समर्थन केले. दूरदर्शन हे स्वायत्त आहे. त्यांचा निर्णय ते स्वत: घेतात. सरकार त्यात हस्तक्षेप करीत नाही. संघाच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी होती ती फक्त उठवण्यात आली. दूरदर्शनच नव्हे तर इतर वाहिन्यांनीही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा विरोधकांचा प्रचार खोटा आहे. महाराष्ट्र गुजरातचा मोठा भाऊ आहे हे खुद्द मोदींनीच स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडे मुद्दे नसल्याने ते वाटेल तसे आरोप करीत आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)