मोकाट गुरांच्या मालकाच्या शिक्षेत बदल; कारावासाची शिक्षा रद्द, दंडातही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 07:26 AM2023-03-01T07:26:24+5:302023-03-01T07:26:38+5:30
गुरांचे मालक दिवसभर त्यांची गुरे कुठेही सोडून देतात. ही गुरे बाजारपेठा, रस्त्यांवर कुठेही फिरत असतात किंवा बसतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रामीण भागात बाजारपेठा, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांना आळा घालण्यासाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदीत बदल करण्याबाबतचे विधेयक मंगळवारी विधानसभेत संमत करण्यात आले.
गुरांचे मालक दिवसभर त्यांची गुरे कुठेही सोडून देतात. ही गुरे बाजारपेठा, रस्त्यांवर कुठेही फिरत असतात किंवा बसतात. यातून मार्ग काढणे वाहनचालकांना जिकरीचे होते. त्यामुळेच अशा मोकाट गुरांना आळा घालण्यासाठी गुरांच्या मालकांना दंड करण्याचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात मोकाट गुरे आढळल्यास मालकाला ३०० रुपये दंड आणि एक महिन्याचा कारावास, अशा शिक्षेची तरतूद होती. यात बदल करण्याचे विधेयक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मांडले.
या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला होता. मोकाट जनावरे रस्त्यावर का येतात, याच्या मुळाशी जाऊन त्याबाबत उपाययोजना कराव्या, त्यानंतरच हे विधेयक आणावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली. मात्र, सरकारने हे विधेयक संमत केले.
शिक्षेची तरतूद
nआधी : ३०० रुपये दंड, एक महिन्याचा कारावास
nआता : कारावासाची तरतूद रद्द. पहिल्या अपराधासाठी दीड हजार रुपये दंड. दुसऱ्या आणि त्यापुढच्या कितीही अपराधांसाठी पाच हजार रुपये दंड