मोदींचा आघाडी सरकारवर हल्लाबोल, शिवसेनेचा उल्लेखही नाही
By admin | Published: October 4, 2014 04:17 PM2014-10-04T16:17:25+5:302014-10-04T20:15:37+5:30
आघाडी सरकारमुळे एक अख्खी पिढी बरबाद झाली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मात्र संपूर्ण भाषणात त्यांनी शिवसेनेचा उल्लेखही केला नाही.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ४ - आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारामुळे एक अख्खी पिढी बरबाद झाल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रावादी सरकारवर हल्ला चढवला मात्र संपूर्ण भाषणादरम्यान शिवसेनेचा त्यांनी उल्लेखही केला नाही. पंकजा व प्रीतम मुंडे यांच्यासाठी बीडमध्ये घेण्यात आलेल्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. मात्र शिवसेना वा युतीच्या तुटीवर त्यांनी संपूर्ण मौन बाळगले.
गेली १५ वर्ष तुम्ही ज्या सरकारला निवडून दिले त्यांनी जनतेापेक्षा फक्त स्वत:ची चिंता केली असे सांगत हे राष्ट्रवादी सरकार नसून भ्रष्टवादी सरकार असल्याची टीका त्यांनी केली. गुजरात हा महाराष्ट्राचा धाकटा भाऊ आहे, पण आज महाराष्ट्रापेक्षा गुजरातची स्थिती चांगली आहे. आघाडी सरकारमुळेच राज्याची वाट लागली आहे, असे ते म्हणाले. देशाचा विकास करायचा असेल तर प्रथम महाराष्ट्र वाचवावा लागेल असे त्यांनी सांगितले. मला दिल्लीत बसून महाराष्ट्राची सेवा करायची आहे, महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे घेऊन जायचे आहे, मात्र त्यासाठी माझ्यात व तुमच्यामध्ये कोणताही अडथळा येऊन चालणार नाही, त्यामुळे या निवडणुकीत कमळावर शिक्का मारून भाजपाला बहुमताने जिंकून द्या आणि राज्यात सुशासन आणा असे आवाहन त्यांनी केले.
मुंडे असते तर...
गोपीनाथ मुंडे मला लहान भावासारखे होते, ते जर आज हयात असते तर मला महाराष्ट्रात यायची गरजच पडली नसती असे सांगत मुंडेचे स्वप्न प्रत्यक्षात आणूया असेही ते म्हणाले.