मोदींच्या देहबोलीवरून नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं दिसतंय- राज ठाकरे
By admin | Published: January 2, 2017 07:17 PM2017-01-02T19:17:38+5:302017-01-02T19:25:53+5:30
मोदींच्या देहबोलीवर नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं दिसत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या देहबोलीवर नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं दिसत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपाला 60 वर्षं झाली तरी अजूनही उमेदवार सापडत नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर भाजपा सत्तेत आली. भाजपाला घोषणा करण्याची भयंकर आवड आहे, मुख्यमंत्री निव्वळ घोषणा आणि उद्घाटनं करतात, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, शिवस्मारकाचं भूमिपूजन निव्वळ मतांसाठी केलं जातंय. शिवस्मारकाचा खर्च गड-किल्ल्यांवर करा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा भव्य शिवस्मारक यांना उभारायचं आहे. राम मंदिर उभारता येत नाही म्हणून एका स्टेशनला ते नाव देताय. भाजपाची राम मंदिर निर्माणाबाबतची भूमिका बदलली असल्याची टीकाही त्यांनी केली. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या रोजगारांत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या, हल्ली कुणीही उठतो आणि कोर्टात जातो. मोदींना देश समजणं कठीण जातंय तर कोर्टाला कसा समजणार ?, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी आणि न्यायालयावरही टीकेची झोड उठवली आहे.