मोदींच्या गुजरातेत गुंतवणुकीला ओहोटी
By admin | Published: September 23, 2014 05:30 AM2014-09-23T05:30:33+5:302014-09-23T05:30:33+5:30
गुंतवणुकीसाठी देशात गुजरात हे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे राज्य असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी केला
मुंबई : गुंतवणुकीसाठी देशात गुजरात हे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे राज्य असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी केला असला तरी प्रत्यक्षात २०११ पासून गुजरातेतील ओहोटी लागल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन’ (डीआयपीपी) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०११ च्या तुलनेत गेल्या तीनवर्षांत ही गुंतवणूक ३३ टक्क्यांनी घटल्याची नोंद झाली आहे.
विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकूण ५४४ प्रस्ताव आले होते. या अंतर्गत सुमारे १.४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. या तुलनेत, २०१३ मध्ये केवळ ३५४ प्रस्ताव आले असून यापोटी ९५ हजार २५९ कोटी रुपयांचीच गुंतवणूक झाली. तर, २०१४ मध्ये आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीतही घट दिसून आली असून २०१३ च्या याच कालावधीच्या तुलनेत ही घट ६४ टक्के इतकी आहे. २०१३ मध्ये या कालावधीपर्यंत गुजरातेत ६१ हजार ८४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र, यंदा आतापर्यंत अवघी २१ हजार ९७९ कोटी रुपयांचीच गुंतवणूक झाली आहे. केवळ नवीन गुंतवणूकच नव्हे तर सध्या कार्यरत कंपन्यांनी देखील विस्तारासाठी फारशी हालचाल केली नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)