'पवारांच्या ताकदीचा धसका तर नाही ना?, मोदींच्या निर्णयावर आमदार बोलले'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:18 PM2020-03-03T12:18:29+5:302020-03-03T12:20:11+5:30
मोदींनी दिलेल्या सोशल संन्यासाच्या संकेतांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला.
नवी दिल्ली : आपण सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या विचारात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच भूकंप झाला. याबद्दल रविवारी बोलू असं मोदींनी म्हटलंय. त्यामुळे मोदी रविवारी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, मोदींच्या या निर्णयानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यात भाजपा आमदारानेही शरद पवारांना उद्देशून ट्विट केलंय.
शरद पवार यांनी भाजपाला संपविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियातून बाहेर पडण्याची घोषणा केली नसेल? हा पवारांच्या प्रचंड राजकीय ताकदीचा धसका तर नाही ना? असे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्याही छातीत कालपासून कळा येत आहेत... असेही त्यांनी म्हटलंय. भातखळकर यांनी उपहासात्मकपणे राष्ट्रवादी आणि शरद पवार यांना टार्गेट केलं आहे.
दरम्यान, मोदींनी दिलेल्या सोशल संन्यासाच्या संकेतांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला. मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. मोदींनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यास ही मंडळी अनाथ होतील. त्यांना अनाथ करणं योग्य नाही. कारण हीच मंडळी त्यांचे सायबर योद्धे आहेत. योद्धे सेनापतींच्या आदेशावरुन काम करतात. पण सेनापतींनीच सोशल मीडियाचं मैदान सोडलं तर मग फौज काय करणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते @PawarSpeaks यांनी भाजपाला संपवण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे तर पंतप्रधान @narendramodi यांनी सोशल मीडिया तून बाहेर पडण्याची घोषणा केली नसेल? हा पवारांच्या प्रचंड राजकीय ताकदीचा धसका तर नाही? माझ्याही छातीत कालपासून कळा येतायत...🤓
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 3, 2020
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला. सोशल मीडियाच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेलं नाही. रात्री ८.५२ वाजता हा धक्का देताना मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन.