मोदींची पहिली विजयी सभा कऱ्हाडातच घेऊ!

By admin | Published: October 13, 2014 10:52 PM2014-10-13T22:52:54+5:302014-10-13T23:04:25+5:30

राजीवप्रताप रुडी : अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत दिले आव्हान; ‘कॉँग्रेस-राष्ट्रवादी’वर हल्लाबोल

Modi's first meeting to be held in Varanasi! | मोदींची पहिली विजयी सभा कऱ्हाडातच घेऊ!

मोदींची पहिली विजयी सभा कऱ्हाडातच घेऊ!

Next

कऱ्हाड : ‘राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यामुळे काँग्रेसला पापातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे; पण महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीला धडा शिकविल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, म्हणूनच भाजपच्या विजयाची राज्यातील पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कऱ्हाडात घेऊ,’ असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार राजीवप्रताप रुडी यांनी व्यक्त केला.येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, डॉ. अतुल भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे उमेदवार मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे नेते राजाभाऊ देशपांडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जगदीश जगताप, नगरसेवक विनायक पावसकर, विक्रम पावसकर, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, विरोधी पक्षनेते महादेव पवार, धोंडिराम जाधव, विष्णू पाटसकर, नितीश देशपांडे, विकास पाटील, लक्ष्मण जगताप, जयश्री कारंडे, अप्पासाहेब माने, पैलवान आनंदराव मोहिते, नईम कागदी उपस्थित होते.
खासदार रुडी म्हणाले, ‘महाराष्ट्रात तब्बल २५ वर्षांनंतर पूर्ण बहुमताने एकपक्षीय भाजप सरकार निवडण्याची संधी जनतेला उपलब्ध झाली आहे. या संधीचा जनतेने लाभ घ्यावा. काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वच पक्ष भाजपाला टीकेचे लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार सत्तेवर येणार या भीतीने त्यांच्याकडून भाजपला टार्गेट केले जात आहेत. काहीजण तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा का घेत आहेत? असा सवाल उपस्थित करतात. मोदींना जनतेची काळजी असल्याने ते प्रचार सभा घेत आहेत. नाहीतर यापूर्वीचे पंतप्रधान मात्र ना हालत होते, ना बोलत होते; पण आज नरेंद्र मोदी केवळ देशाचेच नव्हे, तर जागतिक स्तरावरील नेता म्हणून नावारूपाला येत आहेत. खरंतर लोकसभेला सर्वाधिक जागा मिळवून देऊन भाजप व मित्रपक्षांचे शासन केंद्रात सत्तेवर आणण्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिले आहे. या सरकारचे नेतृत्व करणारे एक शिलेदार बनण्याची संधी डॉ. अतुल भोसले यांना द्यावी.’
विनोद तावडे म्हणाले, ‘माझ्या राज्यात गुंडगिरी नाही, अशी जाहिरात करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील गृहमंत्रीच ‘आता निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा,’ असे वक्तव्य करत आहेत. या सरकारने नेहमीच जनतेला फसविण्याचे उद्योग केले. त्यांच्या भ्रष्ट आणि फसव्या कारभाराला जनता कंटाळली आहे. महाराष्ट्राला आता स्वाभिमानी नेते हवे असून, जनतेने विकासाची दृष्टी असणाऱ्या भाजपच्या हातात हे राज्य द्यावे.’
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘ज्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली, त्या यशवंतरावांचा राजकीय घात करण्याचे काम येथील नेत्यांच्या घराण्याने केले. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांना पक्षातून संपविण्याचे कारस्थानही त्यांनीच केले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव मोहिते यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी या निवडणुकीत या मंडळींना जनतेने धडा शिकवावा.’
सभेला भारतीय जनता पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना व विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अजितदादा.. आता तुमची बारी !

राजधानी एक्स्प्रेसला महाराष्ट्राचा डबा जोडा : रुडी
भगव्या रंगाची राजधानी एक्स्प्रेस ही जलद गतीने धावणारी रेल्वे आहे. भाजपाची घोडदौडही त्याच गतीने सुरू असून, भाजपाने आत्तापर्यंत राजस्थान, गोवा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांत सत्ता मिळवित या राजधानी एक्स्प्रेसला डबे जोडले आहेत. आता या गाडीला महाराष्ट्राचाही डबा जोडा आणि देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला गती द्या,’ असे आवाहन खासदार राजीवप्रताप रुडी यांनी केले.

Web Title: Modi's first meeting to be held in Varanasi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.