मोदींची जादू ओसरतेय
By admin | Published: August 5, 2014 01:07 AM2014-08-05T01:07:44+5:302014-08-05T01:07:44+5:30
लोकसभेतील पराभव अनपेक्षित अन् धक्कादायक होता. मोदींनी देशाला खोटी स्वप्ने दाखविली. भुरळ टाकळी. जनता फसली. आता लोकांना वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. कुठे आहेत अच्छे दिन,
विदर्भाशी दुजाभाव होणार नाही : मुख्यमंत्री चव्हाण यांची ग्वाही
नागपूर : लोकसभेतील पराभव अनपेक्षित अन् धक्कादायक होता. मोदींनी देशाला खोटी स्वप्ने दाखविली. भुरळ टाकळी. जनता फसली. आता लोकांना वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. कुठे आहेत अच्छे दिन, असे लोक विचारू लागले आहेत. मोदींची जादू ओसरत आहे. नुकतेच झालेले सर्वेही तसेच सांगताहेत, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. विदर्भाशी दुजाभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही देत ताकदीने पक्षाच्या कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
काँग्रेसचा विदर्भ विभागीय मेळावा वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस माजी खा. मुकुल वासनिक, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, पालकमंत्री नितीन राऊत, माजी खा. विलास मुत्तेमवार, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री, माजी खासदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचार पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. हाच धागा पुढे धरत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, लोकसभेत सोशल मीडियाचा वापर करण्यात आपण कमी पडलो. विरोधकांनी बूथ लेव्हलवर मायक्रोप्लॅनिंग केले होते. त्याच धर्तीवर आपणही निष्ठावान कार्यकर्त्यांची यादी तयार करून, त्यांचे मोबाईल नंबर गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. उत्तराखंडमध्ये पोटनिवडणुकीत तिन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. लोकांना त्यांची चूक लक्षात येत आहे. त्यामुळे निराश न होता कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भ विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा पाढा वाचला. झुडपी जंगल, नझुल जमीन पट्टे हस्तांतरण, वस्त्रोद्योग धोरण आदी बाबतीत निर्णय घेतले.
औद्योगिक धोरणात विदर्भाला झुकते माप दिले. संचालन शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले. या वेळी माजी मंत्री रणजित देशमुख, विनोद गुडधे पाटील, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, सुबोध मोहिते, वसुंधरा देशमुख, माजी खा. बाळकृष्ण वासनिक, गेव्ह आवारी, माजी आ. सुधाकरराव गणगणे, अशोक धवड, आ. विजय वडेट्टीवार, आ. रावसाहेब शेखावत, आ. सुनील केदार, आ. दीनानाथ पडोळे, आ. विजय खडसे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)