मोदींच्या सभेने भाजपच्या प्रचाराची सांगता
By admin | Published: October 13, 2014 10:05 PM2014-10-13T22:05:09+5:302014-10-13T23:06:18+5:30
रत्नागिरी जिल्हा : भाजपच्या पाचही उमेदवारांची आघाडी सरकारवर कडाडून टीका
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रत्नागिरीतील सभेला सोमवारी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या सभेने भाजपच्या प्रचाराची सांगता झाली. भाजपा सरकार येत्या दोन वर्षात मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणार आहे. एकूणच विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे, असे चिपळूणचे उमेदवार माधव गवळी यांनी सांगितले. कोकणाला निसर्गाचे फार मोठे वरदान लाभले आहे. आघाडी सरकारची विकासाची संकल्पना रस्ते, शौचालये, पाखाडी, एस. टी.शेड व स्मशानशेडपुरतीच सीमित राहाते. परंतु यापुढे मोदींच्या विकासाच्या संकल्पना सुरू होत असल्याचे राजापूरचे उमेदवार संजय यादवराव यांनी सांगितले. गुजरातप्रमाणे येथील बंदरांचा विकास करण्यात येणार आहे. येथील तरूणवर्ग येथेच राहिला, तर विकास होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
आघाडी सरकारने गेल्या २५ वर्षांत जनतेची निराशा केली आहे. खुंटलेला विकास करण्यासाठी, बलशाली भारत निर्माण होणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योगधंदे येणेही आवश्यक असल्याचे दापोलीचे उमेदवार केदार साठे यांनी सांगितले.
गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून विधवांना, अपंगांना दरमहा दोन हजार, ९० टक्के विधवांना ३५०० रूपये, लग्नाच्या मुलीला (लाडली लक्ष्मी) योजनेंतर्गत एक लाख रूपये, तर गृहिणींना दरमहा १२०० रूपये महागाई भत्ता देण्यात येत आहे. कलाकार मंडळींना २५०० रूपये मानधन देण्यात येते. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात पेट्रोल ११ रूपयांनी स्वस्त आहे. एकूणच महाराष्ट्रात या सुविधा अपेक्षित आहेत. त्यासाठी भाजपा सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन गोव्याचे उद्योगमंत्री माधव नाईक यांनी केले.
मासे निर्यातीचा व्यवसाय करताना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र, येथील मच्छिमारांच्या असलेल्या व्यथा मच्छिमारांचा मुलगा अधिक जाणतो. पंतप्रधान मोदी यांच्या विकासाचा आलेख उंचावणारा आहे, त्यांच्यातील देशप्रेमही विलक्षण असल्याने आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे रत्नागिरी येथील उद्योजक रफीक नाईक यांनी सांगितले. डिझेल परताव्यासाठी मच्छिमारांना अनेक हेलपाटे मारावे लागले. आघाडी शासनाने घरेलू कामगार मानधनात घोटाळा केल्याचे गुहागरचे उमेदवार विनय नातू यांनी सांगितले.
गेल्या १५ वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे येथील युवक पंतप्रधान मोदी यांच्याकडे अपेक्षेने पाहात आहे. मच्छिमारांना डिझेल सबसिडी मिळावी, आंबा, काजू बागायतदारांचे प्रश्न सोडविण्याबरोबर आंब्याची परदेशी निर्यात खुली करावी, कोकण रेल्वेमार्ग दुहेरी करण्यात यावा आदी मागण्या रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडल्या.
यावेळी भाजपाचे रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने, गुहागरचे डॉ. विनय नातू, राजापूरचे संजय यादवराव, चिपळूणचे माधव गवळी, तर दापोलीचे केदार साठे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शिल्पा पटवर्धन, जे. पी. जाधव, अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. बाबासाहेब परूळेकर, रफीक नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सभेच्या ठिकाणी झेडप्लस सुरक्षा असल्याने सभामंडपात सोडताना तपासणी सुरू होती. पर्स, पिशव्या, पाण्याच्या बाटल्या बाहेरच ठेवाव्या लागत होत्या. महिला, पुरूष शांतपणे पर्स व साहित्य बाहेर ठेवून सभेला बसले.
काळे कपडे घातलेल्या लोकांना सभेसाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळेच एका तरूणाला तर मंडपातून बाहेर काढण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्हाभरातून आलेल्या लोकांची गर्दी मोठी होती. झेडप्लस सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सभेपासून वाहने पार्किंग लांब असल्यामुळे भर उन्हातून चालत यावे लागत होते.
सभा संपल्यानंतर अथांग जनसागर चंपक मैदानातून बाहेर पडला. उद्यमनगरमार्गे मारूती मंदिर, तर काही मंडळी चर्मालयमार्गे साळवीस्टॉप, शिवाजीनगरकडे जाताना दिसत होती. दूरवर माणसांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.
आणि तो धनुष्यबाण सामंतांच्या हातात?
धनुष्यबाण... रामायणात रामाने हाती घेतला, महाभारतात अर्जुनाने त्याला हाती घेतला. शिवसेनेने हाच धनुष्यबाण आजपर्यंत अगदी जिवापाड सांभाळला आणि आता? तो उदय सामंतांच्या हातात देऊन टाकला, अशा शब्दात गोव्याचे उद्योगमंत्री माधव नाईक यांनी खिल्ली उडवताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.