काँग्रेसच्या धोरणांवरच मोदींची वाटचाल

By admin | Published: January 19, 2015 12:54 AM2015-01-19T00:54:25+5:302015-01-19T00:54:25+5:30

सुरुवातीला मिश्र आणि नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारून काँग्रेसने भांडवलदारी धोरण अवलंबविले. या धोरणामुळे कामगारांचे नुकसान झाले आहे. आता मोदी सरकारची सुद्धा काँग्रेसच्याच

Modi's path to Congress's policies | काँग्रेसच्या धोरणांवरच मोदींची वाटचाल

काँग्रेसच्या धोरणांवरच मोदींची वाटचाल

Next

भामसं विदर्भ अधिवेशनाचे उद्घाटन : कृष्णचंद्र मिश्र यांची टीका
नागपूर : सुरुवातीला मिश्र आणि नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारून काँग्रेसने भांडवलदारी धोरण अवलंबविले. या धोरणामुळे कामगारांचे नुकसान झाले आहे. आता मोदी सरकारची सुद्धा काँग्रेसच्याच धोरणानुसार वाटचाल सुरू आहे, अशी टीका भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री कृष्णचंद्र मिश्र यांनी येथे केली.
भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशचे १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभातसुद्धा प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी हा मुद्दा लावून धरला.
रविवारी सकाळी राज्याचे कामगार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील अध्यक्षस्थानी होते. तर पश्चिम क्षेत्रीय संघटक रामदौर सिंह, भामसंचे माजी वित्त सचिव वसंतराव पिंपळापुरे, भामसं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभाकर बानासुरे प्रमुख अतिथी होते.
कृष्णचंद्र मिश्र म्हणाले, सरकार कुणाचेही असो, ते भांडवलदारी अर्थव्यवस्था राबवित आहेत. पं. नेहरूंपासून तर मोदींपर्यंत सर्वच एकाच मार्गाने चालत आहेत. संसदेत चर्चा करण्याऐवजी अध्यादेशाने सरकार चालवले जात आहे. रिटेलमध्ये एफडीआय येऊ देणार नाही, असे सांगितले जात होते. परंतु आता सर्वच क्षेत्रात एफडीआय येत आहे.
आधीच कामगार कायद्यांची फारशी अंमलबजावणी होत नाही, अशात आहे ते कायदे सुद्धा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब कामगार जगणार तरी कसा? काँग्रेसने राबवलेल्या धोरणांमुळे त्यांना काय परिणाम भोगावे लागलेत, हे सर्वांनीच पाहिले आहेत. तेव्हा सध्याचे सरकारही त्याच दिशेने वाटचार करीत असेल तर त्यांचे हाल काय होतील, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच भारताचा विकास हा भारताच्या दृष्टीने होणार की अमेरिकेच्या धर्तीवर होणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय मजदूर संघ ही कामगारांच्या हितासाठी काम करणारी स्वतंत्र संघटना आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही असो, कामगारांच्या हितासाठी आम्ही आवाज उचलत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. रमेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय मजदूर संघाच्या कार्याचा आढावा घेतला. भामसंचे विदर्भ प्रदेश महामंत्री अशोक भुताड यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी संचालन केले. नागपूर जिल्हा सचिव गजानन गटलेवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कामगारांचे हित जोपसणार
महाराष्ट्र सरकार कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असून नवीन धोरण आखले जात आहे. कामगारांच्या कायद्यात सुधारणा करीत असतांना कामगारांच्या हिताला बाधा निर्माण होणार नाही, असे आश्वासन राज्याचे श्रम राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात दिले.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार
राज्यमंत्री विजय देशमुख आणि कृष्णचंद्र मिश्र यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भारतीय मजदूर संघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वसंतराव देवपुजारी, मधुसूदन रावल, नानासाहेब खेडकर, बाबासाहेब हरदास, दिनकरराव जोशी, मारोतराव धार्मिक, विश्वंभर वाघमारे, राजाभाऊ चिटणवीस, प्रभाकर खोलकुटे, सुरेश देशपांडे, डॉ. सुधाकर कुळकर्णी, सुनील लाभसेटवार, वसंतराव वानखेडे आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Modi's path to Congress's policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.