मोदींच्या ‘कुछ तुफानी करते हैं’मुळे सामान्य उद्ध्वस्त
By admin | Published: February 17, 2017 03:20 AM2017-02-17T03:20:31+5:302017-02-17T03:20:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एके दिवशी सकाळी लहर आली आणि चलो कुछ तुफानी करते हैं, म्हणत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय देशावर लादला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एके दिवशी सकाळी लहर आली आणि चलो कुछ तुफानी करते हैं, म्हणत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय देशावर लादला. पंतप्रधानांच्या या तुफानी निर्णयामुळे सामान्य मध्यवर्गीय आणि गरीब मात्र उद्ध्वस्त झाल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो केला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील त्यांच्या रोड शोंना चांगला प्रतिसाद मिळाला. रोड शोदरम्यान शिंदे यांनी चक्क मराठीतून लोकांशी संवाद साधला. मी पक्का मुंबईकर आहे. माझा जन्म मुंबईतलाच. २० वर्षांपासून इथे शिवसेना, भाजपाची अभद्र युती आहे. नद्या स्वच्छ करण्याचे आश्वासन देणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना साधे पिण्याचे पाणी देता येत नाही. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईकरांना चांगले रस्ते देण्यातही भाजपा, शिवसेना अपयशी ठरली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या प्रतिसादामुळे शिंदे यांचा रोड शो लांबला. त्यामुळे नंतरचा मुंबईतील व्यापाऱ्यांसोबतचा चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागला. सध्या भाजपा आणि शिवसेनेत सुरू असलेले वादंग म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे. २० वर्षे भाजपाला महापालिकेतील भ्रष्टाचार दिसला नाही. आता अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आपला सहकारी भ्रष्ट असल्याचा साक्षात्कार झाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी सडकून टीका केली. मोदी यांचे केवळ एकच ध्येय आहे ते म्हणजे ‘दिखाओ सपना और सबका माल करो अपना.’ नोटाबंदी म्हणजे देशातील अतिश्रीमंत वर्गाला पंतप्रधानांनी दिलेली भेटवस्तू आहे. सामान्यांनी कष्टाने मिळवलेला आणि जमा केलेला पैसा एका फटक्यात त्यांनी बाद केला. लोकांना कंगाल करणे म्हणजेच भाजपाचे कॅशलेस धोरण आहे का, असा सवाल शिंदे यांनी केला. (प्रतिनिधी)