मो.ह. शाळा वाचवण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 03:32 AM2017-04-06T03:32:42+5:302017-04-06T03:32:42+5:30
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने अनोखे जनजागृती अभियान सुरू केले
ठाणे : मराठी शाळा सुरू राहावी आणि तेथील पटसंख्या वाढावी, यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने अनोखे जनजागृती अभियान सुरू केले आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी जोगवा मागितला जात आहे. त्यात यश आल्याचे दिसत असून आतापर्यंत बालवर्गातील १५ जणांचा शाळा प्रवेश निश्चित झाला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकण्याचा सामान्यांपासून ते उच्चभ्रू अशा सर्वांचा क ल वाढला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही शाळा वाचावी, यासाठी मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक सरसावले आहेत. विशेष म्हणजे मिनी शिशू वर्गापासून ते इयत्ता चौथीपर्यंतच्या वर्गात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून विनाडोनेशन प्रवेश तसेच ८ एप्रिलपर्यंत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तूदेखील देण्यात येत आहे. त्यानुसार, आतापर्यंत तब्ब्ल १५ मुलांचे बालवर्गासाठी प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली ते चौथी प्रवेशासाठी आतापर्यंत ३० अर्ज पालक घेऊन गेले आहेत. तसेच मो.ह. विद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी आरटीई नियमाप्रमाणे प्रवेश घ्यावा, असे आवाहनदेखील प्राथमिक विभागाने केले आहे.
बाहरेच्या गावांतून येणाऱ्या मुलांसाठी बससेवा सुरू करावी, असे पत्र ठामपा परिवहन सभापतींना पत्र देणार असल्याचे आणि त्यांना विनंती करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
>बसचा प्रश्न महत्त्वाचा
माणकोली, अंजूरदिवे परिसरांतील मुले शाळेत येण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांना खासगी बसचा खर्च परवडणारा नाही.
पालकवर्ग संभ्रमात पडल्याचे चित्र या वेळी शिक्षकांना निदर्शनास आले. तो प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले.