मोहम्मद खान यांची हकालपट्टी

By admin | Published: July 7, 2017 04:41 AM2017-07-07T04:41:56+5:302017-07-07T04:41:56+5:30

गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांना राज्य शासनाने आयोगाच्या अध्यक्षपदावरून

Mohammad Khan's expulsion | मोहम्मद खान यांची हकालपट्टी

मोहम्मद खान यांची हकालपट्टी

Next

विशेष प्रतिनिधी / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांना राज्य शासनाने आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे. खान हे जळगाव जिल्ह्यातील असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
खान यांना जानेवारी २०१५मध्ये आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. काही प्रकरणांत त्यांनी स्वत: न्यायालय असल्याच्या थाटात आदेश पारित केले, अशी तक्रार झाली होती. जमीन महसूल संहितेंतर्गत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा वापर ते करीत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. काही प्रकरणांत त्यांनी स्वत:ला अधिकार असल्याच्या थाटात सुनावणी दिल्याचेही तक्रारीत म्हटले होते.
सूत्रांनी सांगितले की, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक खान यांच्या अध्यक्ष कार्यालयात वावरत असत. अशा लोकांबद्दल तक्रार आल्यानंतर चौकशी करण्यात आली. मुंबई व मुंबईबाहेर गुन्हे दाखल करण्यात आलेले काही जण कायम त्यांच्या कार्यालयात असतात ही बाब चौकशीतून समोर आली. राष्ट्रीय मानचिन्हाचा त्यांनी खासगी कार्यक्रमाच्या पत्रिकेत गैरवापर केला. एका खासगी इफ्तार पार्टीच्या पत्रिकेत विनीतमध्ये आयोगाच्या सचिवांचे नाव टाकले. सचिवांनी त्यावर आक्षेप घेतला होता. ठाणे येथील एक अतिक्रमण हटवू नये, असा आग्रह त्यांनी तेथील महापालिका आयुक्तांकडे धरला होता, ही बाबही चौकशीमध्ये समोर आली. विविध आरोपांबाबत मोहम्मद हुसेन खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की, खान यांच्याबाबतच्या तक्रारींचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता. अध्यक्षपदावरून खान यांना हटविण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि त्यानंतर आदेश निघाला.

Web Title: Mohammad Khan's expulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.