मोहन भागवतांनी बुरसटलेला विचार नव्याने मांडला - उद्धव ठाकरे
By admin | Published: August 22, 2016 11:53 AM2016-08-22T11:53:35+5:302016-08-22T11:53:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जुनाच बुरसटलेला विचार नव्याने मांडला आहे. इतर धर्मीय लोक जर अनेक मुलांना जन्म देऊ शकतात.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जुनाच बुरसटलेला विचार नव्याने मांडला आहे. इतर धर्मीय लोक जर अनेक मुलांना जन्म देऊ शकतात तर हिंदूंना कोणी रोखले आहे? सरसंघचालकांनी केलेले विधान सुसंस्कृत व पुरोगामी हिंदू समाजाला पचनी पडणारे नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरसंघचालकांच्या हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा या वक्तव्यावर टीका केली आहे.
त्याचप्रमाणे मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार शोधण्यापेक्षा नागपूरमधल्या जनतेला खड्डेमुक्त रस्ते द्या असा सल्ला दिला आहे. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर. पुन्हा दिल्लीतच ‘नागपूरकर’ गडकरी उच्चस्थानी आहेत. ही सर्व ‘बॉस’ मंडळी उच्चस्थानी बसून राजशकट हाकीत असताना नागपूरला या खड्ड्यांनी जो वात आणला आहे त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जुनाच बुरसटलेला विचार नव्याने मांडला आहे. इतर धर्मीय लोक जर अनेक मुलांना जन्म देऊ शकतात तर हिंदूंना कोणी रोखले आहे? सरसंघचालकांनी केलेले विधान सुसंस्कृत व पुरोगामी हिंदू समाजाला पचनी पडणारे नाही. मुसलमानांची लोकसंख्या वाढते आहे ही चिंतेचीच बाब आहे, पण म्हणून त्यांच्याप्रमाणे हिंदूंनीही पोरांचे लटांबर वाढवायचे हा विचार देशहिताचा आहे असे संघशिस्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करणार नाहीत. गोमांस प्रकरणात मोदी यांनी इतर हिंदू संघटनांपेक्षा वेगळी भूमिका आधीच घेतली आहे व गोरक्षणाच्या नावाखाली काही लोकांनी धंदा सुरू केला आहे असे मोदी यांनी फटकारल्यापासून शंकराचार्य व इतर साधुसंतांनी मोदींवर टीका केली. देशात कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे व सरकार या कार्यक्रमांवर प्रचंड पैसा खर्च करीत आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या सवाशे कोटींवर जाऊन पोहोचली व त्यात मुसलमानांचा भरणा जास्त आहे. मुसलमानांची लोकसंख्या रोखली गेली नाही तर तर हिंदुस्थानचा सामाजिक, सांस्कृतिक समतोल बिघडेल हे खरेच, पण त्यासाठी हिंदूंनी अधिक मुलांना जन्म देणे हा उपाय नसून देशात समान नागरी कायदा लावून मुसलमानांसह सर्वच धर्र्मायांवर कुटुंब नियोजनाची सक्ती करणे हाच मार्ग आहे.
- हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिल्याने आधीच हलाखीत जगणारे लोक बेरोजगारी, भूक, महागाईने अधिकच होरपळतील व लोकसंख्यावाढीचे अराजक निर्माण होईल ते वेगळेच. मुसलमानांची मुले जास्त आहेत त्याप्रमाणे त्यांच्या बायकाही जास्त आहेत. मग हिंदूंनीही एकापेक्षा जास्त लग्नं करावीत, असा फतवा काढून सरकारला तसा कायदा करायला लावणार आहात काय? भागवत हे सरसंघचालक आहेत. त्यांनी अशी विधाने करू नयेत. साध्वी प्राची, साक्षी महाराज, प्रवीण तोगडिया यांनीही हिंदूंनी पोरांची लटांबरे वाढवून मुसलमानांना शह द्यावा, असा दिव्य विचार यापूर्वी मांडला आहे. सरसंघचालकांनीही त्याचीच ‘री’ ओढू नये. कारण ते सरसंघचालक आहेत. त्यामुळे ‘सरसंघचालक, तुम्हीसुद्धा?’ असा प्रश्न एखाद्याच्या मनात आलाच तर त्याला काय उत्तर आहे? खरे म्हणजे हे विचार म्हणजे हिंदुत्वास लागलेली जळमटे आहेत. त्यापेक्षा समान नागरी कायदा व सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा आग्रह सरसंघचालक का धरीत नाहीत?
- महाराष्ट्राची उपराजधानी ‘खड्डेमुक्त’ करावी व जनतेस चांगले रस्ते मिळावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची ‘पिपाणी’ फुंकणार्यांनी नागपुरातील खड्ड्यांबाबत तेथे फुंकल्या जाणार्या तुतार्यांची दखल घेतली तर लोकांना बरे वाटेल. नागपूरच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड आहे. दिल्लीत आहेे तसे संपूर्ण बहुमताचे राज्य नागपुरात असले तरी बहुमत देणारी जनता खड्ड्यातून मार्ग काढीत कसेबसे जीवन कंठीत आहे. महानगरपालिकेचे काम नागरिकांना सुविधा देणे, रस्ते, नाले, गटारे, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे; पण हे सर्व तेथील जनतेला मिळत आहे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शहर. पुन्हा दिल्लीतच ‘नागपूरकर’ गडकरी उच्चस्थानी आहेत. ही सर्व ‘बॉस’ मंडळी उच्चस्थानी बसून राजशकट हाकीत असताना नागपूरला या खड्ड्यांनी जो वात आणला आहे त्याची जबाबदारी कोणी घ्यायची?
- नागपुरात सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची बोंब आहे. सिमेंट रस्ते तयार करताना जलवाहिन्यांचे नुकसान झाले. त्या नव्याने बसवायला हव्या होत्या. तसे झाले नाही. इतरही अनेक प्रश्न नागपुरात ‘आ’वासून उभे असले तरी स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूरचे नाव टाकून येथील जनतेची तोंडे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. पैसा कमी पडणार नाही. रस्त्यांची कामे खुशाल होऊ द्या, असा नारा नितीन गडकरी देत आहेत, पण नागपूरचे खड्डे हे त्यांच्यासाठी आव्हान आहे. स्वत: गडकरी हे नागपुरातून लोकसभेत निवडून गेले आहेत व सगळ्यात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी मोठाच नावलौकिक मिळवला आहे; पण त्यांच्या स्वगृही रस्त्यांची जी चाळण झाली आहे तो सर्वच प्रकार चिंताजनक आहे. रस्त्यांची चाळण करून जनतेच्या कोट्यवधी रुपयांना ‘गंडा’ घालणारे हे ठेकेदार कोण आहेत? त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या लुटारूंना तुरुंगाची हवा खायला लावणे हाच न्याय ठरेल. नागपूर शहराचे एक स्वत:चे महत्त्व आणि प्रतिष्ठा महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईइतकीच आहे. ‘संघ’ मुख्यालयापासून दीक्षाभूमीपर्यंत अनेक राजकीय तीर्थस्थाने ज्या नागपुरात आहेत त्या शहराचे रस्ते दुरुस्त करून जनतेला खड्डेमुक्त करा, अशी आम्ही कळकळीची विनंती करीत आहोत!