Mohit Kamboj: विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, मोहित कंबोज म्हणाले 'जय बजरंग बली'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:37 PM2022-08-29T17:37:46+5:302022-08-29T17:48:51+5:30
विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि 505 (2), 37 (1), 135 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर, रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर, कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. कंबोज आणि विद्या चव्हाण यांच्यात ट्विटवर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, या वादाचे पडसाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यापर्यंत गेले आहेत.
विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि 505 (2), 37 (1), 135 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहित कंबोज यांनी फिर्याद दिली आहे. मोहित कंबोज असतील किंवा तो किरीट सोमय्या त्यांना गुजरातमध्ये पाठवून द्या ना, त्यांना महाराष्ट्रात आता काही काम नाही. त्यांनी गुजरातमध्ये जावे, इथे चौकशी करु नये, गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचा व्यापार आहे, लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत. त्यांची चौकशी करावी. महाराष्ट्रात आम्ही लोक आहोत, आम्ही चौकशी करू, आमचं काय करायचंय ते करू. गृहमंत्री प्रामाणिक लोकांच्या चौकश्या लावतो, आणि गुन्हेगार लोकांना मंत्रीपदं देतो, असे विधान विद्या चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्याविरुद्ध मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. प्रांतिक आणि भाषिक वाद निर्माण केल्याची ही फिर्याद आहे.
जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली...
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 29, 2022
जय सियाराम !
FIR Registered Against Vidya ताई Chavan Ji Under Section IPC 505 (2) , 37 (1) , 135 , 500 !
हर हर महादेव !@Vidyaspeakspic.twitter.com/072OV6bw2H
दरम्यान, मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यांनी या गुन्ह्याचा एफआरआरही शेअर केला आहे. तसेच, बंजरंग बली की जय, असे ट्विटही त्यांनी केले आहे.
कंबोज आणि चव्हाण यांच्यात ट्विटर वॉर
'विद्या ताई जय श्री राम', असं ट्विट कंबोज यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्याबोबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक काळात पैसे वाटपाच्या आरोपावेळी फडणवीसांच्या एका फोनमुळे मोहित कंबोजची सुटका झाली होती असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.
फडणवीसांकडे गृहखातं असल्याने ते वाचले
“भाजपचे बरेच नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मोहित कंबोज कोण त्यांना मी ओळखत नाही. ते माझ्या परिचयाचे नाहीत. एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते. पण तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की हे मोहित कंबोज आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत. फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा किस्सा विद्या चव्हाण यांनी सांगितला.
मोहित कंबोज महाठग
“मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय.