‘मोहसीन हत्या खटला सालीयन यांच्याकडे सोपवा’
By Admin | Published: July 13, 2017 04:59 AM2017-07-13T04:59:15+5:302017-07-13T04:59:15+5:30
मोहसीन शेखची हत्या करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधातील खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ रोहिणी सालियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची फेसबुकवर बदनामी केल्याच्या आरोपावरून पुण्यातील निरपराध युवक मोहसीन शेखची हत्या करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधातील खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ रोहिणी सालियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, अशी मागणी त्याचे वडील सादीक शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहसचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची बुधवारी भेट घेऊन ही मागणी केली आहे.
राज्यभरात चर्चेला आलेल्या या खटल्यातून ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून या खटल्यात सरकारचा कोणीही वकील नाही. त्या पार्श्वभूमीवर सादीक शेख व पुण्यातील महाराष्ट्र अॅक्शन कमिटी या संस्थेच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन अॅड. रोहिनी सालियन यांच्या नेमणुकीची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची २ जून २०१४ रोजी बदनामी करण्यासाठी काही समाजकंटकांनी फेसबुकवर फोटो ‘अपलोड’ केले होते. या कारणावरून पुणे शहर व परिसरात दंगल उसळली होती. या वेळी हडपसर भागातील इंजिनीअर मोहसीन शेखने हे कृत्य केले,असा आरोप करीत हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक धनंजय उर्फ मनोज देसाई व अन्य कार्यकर्त्यांनी त्याची निर्घृण हत्या केली. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या खटल्यात अॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.
कोण आहेत सालियन?
अॅड. रोहिणी सालियन या फौजदारी खटल्यातील ज्येष्ठ विधिज्ञ असून, गेल्या ३५ वर्षांहून अधिक वर्षांचा त्यांना अनुभव आहे. २००८मधील मालेगाव बॉम्बस्फोट, ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील बॉम्बस्फोट या खटल्यांत विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. साध्वी प्रज्ञासिंगविरुद्धच्या खटल्यात अधिक तीव्रपणे बाजू न मांडण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांकडून दबाव आणण्यात आला होता, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा निडरपणा त्यांनी दाखविला होता.
समाजात द्वेष पसरवून निरपराध युवकाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. रोहिनी सालियन यांची किंवा अन्य ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.
- अजहर तांबोळी, सचिव, महाराष्ट्र अॅक्शन कमिटी, पुणे
मोहसीन शेख हत्याकांडात विशेष सरकारी वकील नेमण्याप्रकरणी त्याचे नातेवाईक व संस्थेकडून आलेल्या मागणीबाबत शासनाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- सतीश माथूर, पोलीस महासंचालक