उमलत्या कळ्यांना मायेचा ओलावा
By admin | Published: March 6, 2016 01:26 AM2016-03-06T01:26:49+5:302016-03-06T01:26:49+5:30
सळसळते चैतन्य, उत्साहाचा झरा, सर्वांना प्रेमाचा ओलावा आणि मायेची ऊब देणाऱ्या चिमुरडीला आता हक्काचे घर मिळू लागले आहे. या उमलत्या कळ्या आता अनेक घरांमध्ये आनंद फुलवू लागल्या आहेत
प्रज्ञा केळकर-सिंग/ हिनाकौैसर खान-पिंजार, पुणे
सळसळते चैतन्य, उत्साहाचा झरा, सर्वांना प्रेमाचा ओलावा आणि मायेची ऊब देणाऱ्या चिमुरडीला आता हक्काचे घर मिळू लागले आहे. या उमलत्या कळ्या आता अनेक घरांमध्ये आनंद फुलवू लागल्या आहेत. घराला घरपण देणारी ‘ती’ पालकांना हवीहवीशी वाटू लागली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये दत्तक घेण्यात आलेल्या मुलींची संख्या २ हजारांहून अधिक आहे. तर, मुलांची संख्या १७३० इतकी आहे. प्रत्येक वर्षी दत्तक मुलींच्या संख्येत वाढ होत असून, मुलींसाठीची पालकांची प्रतीक्षा यादीही वाढतच आहे.
राज्यातील विविध दत्तक केंद्रातून मुली दत्तक जाण्याचे प्रमाण अधिक आहे. महिला व बाल विकास विभागाच्या दत्तककक्षाकडील माहितीनुसार दर वर्षी दत्तक घेणाऱ्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलीच्या संगोपनातही पालकत्वाचा आनंद मिळू शकतो आणि त्याही आपल्या जगण्याचा आधार होऊ शकतात, या भूमिकेतून पालक मुलींना प्राधान्य देत आहेत. समाज पूर्वग्रह दूषित राहिला नाही. मुलगी-मुलगा असा भेद दत्तक घेताना केला जात नाही. सहजपणे मुलींना आपल्या घरात सामावून घेत आहेत, हे या आकडीवारीवरून पाहायला मिळते.
समाजात एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. वाढत्या दुर्घटनांचे प्रमाण पाहता, मुलींचे संगोपन पालकांवरील दडपण वाढवते. मुली मोठ्या होऊन समाजात वावरू लागल्यावर त्यांना वाईट अनुभव येऊ नयेत, वाईट नजरांचा सामना करावा लागू नये आणि कळ्या उमलण्याआधीच कोमेजून जाऊ नयेत, अशीच पालकांची इच्छा असते. त्यामुळे मुलगी जन्माला आली की नकळत पालकांच्या चेहऱ्यावर आठ्या पाहायला मिळतात. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे अपत्य होऊ न शकणारी अथवा एकच अपत्य असलेली दाम्पत्ये मुलींना दत्तक घेण्यास प्राधान्य देत आहेत. महिला व बालकल्याण विभागाकडे त्याबाबत पालकांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे.
पूर्वी मुलगा अथवा मुलगी दत्तक घेण्यासाठी दत्तकगृहात जाऊन नोंदणी करावी लागत होती. १ आॅगस्ट २०१५ पासून दत्तक प्रक्रिया आॅनलाईन राबवली जाते. दत्तक घेण्यास इच्छुक असणाऱ्या अनेक पालकांनी मुली दत्तक घेण्यासाठी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. भारताबाहेर राहणाऱ्या पालकांना ‘कारा’ या संस्थेच्या माध्यमातून मूल दत्तक घेता येते. या संस्थेच्या माध्यमातूनही मुलींसाठी विचारणा होत असल्याचे, महिला व बालकल्याण विभागातील दत्तक कक्षातर्फे सांगण्यात आले. मानसिकता बदलण्याची गरज
आपल्याला मूल होत नाही, या भावनेपेक्षा आपल्याला मातृत्व-पितृत्व हवे ही भावना जास्त महत्त्वाची असते. अनेकदा पालक दत्तक घेतलेल्या मुला-मुलींसोबत नकळतपणे त्यांच्यावर उपकार केल्यासारखे वागतात. यातून घरात आलेले मूल अधिकाधिक कोमजते. त्यामुळे पालकांनी आपल्याला या मुलांमुळेच आनंद मिळतोय, त्यांच्यामुळेच आई-बाबा होण्याची संधी मिळाली हे विसरून चालणार नाही. अनेकदा नातेवाईक, शेजाऱ्यांसमोर मुले अधिक घुमी आणि असुरक्षित वाटून घेतात. तेव्हा पालकांच्या प्रेमळ भावनाच अधिक महत्त्वाच्या असतात. अन्यथा न्यूनगंडात जाऊन मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. आपण जगाकडे कसे पाहतो तसेच मूल पाहायला शिकत असते. त्यामुळे आपला दृष्टिकोन निर्मळ ठेवल्यास मुले अधिक आनंदी, सुखी होतात. त्यांचे दत्तकपण, अनाथपण बोथट होते. ते संपूर्णपणे गळून पडेलच असे नाही, पण किमान ते टोचत नाही अन् ते महत्त्वाचे आहे. मला स्वत:ला मुलींची विशेष आवड आहे. त्यामुळे मी मुलगी दत्तक घेतली.
- गायत्री पाठक, पाच वर्षांच्या दत्तक मुलीची आईमुलाप्रमाणेच मुलगीही आयुष्याचा आधार होऊ शकते, या जाणिवेतून पालकांचा मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याकडे अधिक कल आहे. मागील पाच वर्षांत दत्तक जाणाऱ्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा लक्षणीयरीत्या वाढले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पालकांचा मुली दत्तक घेण्याकडील ओढा वाढत आहे. अपत्य नसलेले किंवा एक अपत्य असलेले पालकही बहुतांश वेळा मुलींनाच प्राधान्य देतात. परदेशात राहणारे पालकही मुलींसाठी विचारणा करताना दिसतात.
- विद्या लहाडे, जिल्हा परिविक्षा अधिकारी