म्हात्रे हत्याप्रकरणी १९ जणांवर मोक्का
By admin | Published: March 14, 2017 07:43 AM2017-03-14T07:43:04+5:302017-03-14T07:43:04+5:30
भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रशांत म्हात्रे याच्यासह १९ मारेकऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश ठाण्याचे
ठाणे : भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रशांत म्हात्रे याच्यासह १९ मारेकऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिले आहेत. या टोळीने संघटितपणे हत्या करून दहशत पसरवून राजकीय आणि आर्थिक फायदा घेतल्याचे तपासात उघड झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
भिवंडीतील कामतघर येथील मनोज म्हात्रे यांच्या घरासमोरच गाडी पार्किंग करतानाच १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास प्रशांत आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर गोळीबार करून तलवार आणि चॉपरचे वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.
या प्रकरणात आतापर्यंत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गणेश कालवार, विश्वपाल पाटील आणि विदेश म्हात्रे आदी सात
जणांना भिवंडीतून अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार प्रशांतसह १० ते १२ जणांचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. या हत्या प्रकरणात १९ जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून संघटितपणे गुन्हे करून दहशत पसरवून फायदा घेणाऱ्या या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)