ठाण्यात १७ गुंडांवर मोक्का
By admin | Published: July 15, 2016 03:18 AM2016-07-15T03:18:03+5:302016-07-15T03:18:03+5:30
भिवंडी आणि कल्याण ग्रामीण भागात दहशत पसरवून टोळीचे प्रस्थ वाढणाऱ्या दोन गुंड टोळ्यांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम
ठाणे : भिवंडी आणि कल्याण ग्रामीण भागात दहशत पसरवून टोळीचे प्रस्थ वाढणाऱ्या दोन गुंड टोळ्यांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत मोक्काची कारवाई केली आहे. यात टिटवाळ्यातील किरण डोंबाळे आणि भिवंडीमधील जगन पाटील या टोळीप्रमुखांसह १७ जणांचा समावेश आहे. यातील जगन पाटील हा भिवंडीतील सावंद-इताडे-मुठवळ गटग्रामपंचायतीचा माजी सरपंच असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी दिली.
टिटवाळा परिसरातील इंदिरानगर येथील आशीर्वाद डेव्हलपर या कार्यालयात घुसून किरण डोंबाळे व त्याच्या साथीदारांनी डिसेंबर २०१५ मध्ये दिवंगत मनोज जयस्वाल यांच्याकडे ५ लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी तक्रार दिल्याचा राग मनात धरून डोंबाळे याने पुन्हा ८ एप्रिल २०१६ रोजी जयस्वाल यांच्या कार्यालयात साथीदारांसह घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. किरण याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे आदी गुन्ह्यांची कल्याण तालुका पोलिसांत नोंद आहे. त्याचबरोबर, त्याचे साथीदार टिटवाळा पूर्व येथील अमर थोरबोल याच्यावर दोन, तर मुरबाडमधील महेंद्र उर्फ काल्या मधुकर जाधव याच्यावर एक, तसेच मुरबाडमधील साईनाथ शेळके याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर, भिवंडी ग्रामीण पडघा परिसरातील माजी सरपंच जगन उर्फ जगदीश मधुकर पाटील याने आपल्या टोळीच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्याचे सत्र सुरू केले होते. दरम्यान, पाटील हा सावंद-इताडे-मुठवळचा सरपंच असताना त्याला आणि त्याच्या साथीदारांना विकासकांकडून आर्थिक लाभ मिळत होता, परंतु जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा पराभव झाला. या वेळी पाटील आणि त्याच्या साथीदारांनी महिला सरपंचाचे पती संतोष भामरे यांना घातक हत्याराने मारहाण क रून दहशत पसरवली होती.
माजी सरपंच पाटील याच्यावर पडघा, कल्याण तालुका आणि शहापूर या पोलीस ठाण्यांत खुनाचे प्रयत्न, गर्दी, मारामारी, दुखापत आदी ७ गुन्हे दाखल आहेत, तसेच त्याचा साथीदार यशवंत काशिनाथ पाटील याच्यावर दोन, गोरख राघो पाटील याच्यावर तीन, हरिश्चंद्र लहू वेळेकर याच्यावर दोन, रोशन रामा भोईर याच्यावर दोन, श्रीकांत काळुराम मगर याच्यावर तीन, सुधीर पाटील याच्यावर पाच, प्रदीप उर्फ पिंट्या पंढरीनाथ सुरेकरवर तीन, महेंद्र द्वारकानाथ पाटीलवर तीन, प्रदीप उर्फ बादी भगवान पाटील याच्यावर दोन, यतीन पाटील याच्यावर दोन आणि हर्षद उर्फ हर्षल गोराडकर याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)