भर महाविद्यालयात युवतीचा विनयभंग
By Admin | Published: August 12, 2016 09:02 PM2016-08-12T21:02:55+5:302016-08-12T21:02:55+5:30
अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीनं दाद देत नसल्याने चिडलेल्या युवकाने चक्क शुक्रवारी दयानंद महाविद्यालय गाठले
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 12- गेल्या दोन वर्षांपासून मागे लागूनही अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीनं दाद देत नसल्याने चिडलेल्या युवकाने चक्क शुक्रवारी दयानंद महाविद्यालय गाठले आणि त्या युवतीच्या वर्गासमोर तिला पकडून तिचा विनयभंग केला. माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या आईला मारुन टाकेन आणि तुझ्याही अंगावर अॅसिड टाकेन, अशी धमकीही दिली.
अमोल शिवाजी पाटोळे (वज-२०, रा. स्वामी समर्थ मठाजवळ, तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे त्या आरोपी युवकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या मागे अमोल दोन वर्षांपासून लागला होता. सतत तिचा पाठलाग करणे, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकार अमोल करीत होता. मात्र त्याच्या कुठल्याच प्रकाराला ती दाद देत नव्हती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता पीडित मुलगी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली. अमोलने तिचा पाठलाग सुरु केला. सकाळी ११ च्या सुमारास दयानंद महाविद्यालयातील सी-४ या वर्गासमोर येऊन त्याने तिच्या गळ्यातील ओढणी हिसकावून घेत तिचा एक हात पकडला. माझ्याशी बोल नाहीतर तुझ्या आईला मारुन टाकतो, अशी धमकी देत नाहीच बोलली तर तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून जीवे ठार मारण्याची भाषाही त्याने वापरली.
पीडित मुलीने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी अमोल पाटोळे याच्यावर भादंवि कलम ३५४-ड (विनयभंग), बालकांचे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ११ (४), १२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सपोनि पाटील, बनसोडे, फौजदार राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. तपास दुय्यम पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.