आई माझा गुरू, शेतात केलेल्या कष्टाचं झालं चीज - हर्षल भोसले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:13 AM2019-10-27T01:13:20+5:302019-10-27T01:13:40+5:30
आयईएस परीक्षा । भारतात प्रथम आलेल्या सोलापूरच्या हर्षलची भावना
मल्लिकार्जुन देशमुख
मंगळवेढा (जि़ सोलापूर): पाच वर्षांचा असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. आईनंच सारं केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. प्रसंगी शेतात काबाडकष्ट करताना आईच्या हातावरील फोडं़़.. आज हे सारं आठवताना डोळ्यांतील अश्रू दाटताहेत. वडिलांविना पोर म्हणून त्याचं शिक्षण अपूर्ण राहता कामा नये यासाठी तिनं घेतलेल्या कष्टाचं चिज झाल्याच्या भावना आईएस परीक्षेत भारतातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविलेल्या तांडोरसारख्या (ता. मंगळवेढा) छोट्याशा गावातल्या हर्षल भोसले यानं ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण गव्हर्न्मेंट कॉलेज, कराड येथे पूर्ण झाल्यानंतर भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेतले, नंतर राजीनामा दिला. त्यानंतर आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, पुणे येथे त्याची निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) झालेल्या परीक्षेचा शुक्रवारी निकाल लागला अन् हर्षलने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. ऐन दिवाळीत ही गोड बातमी समजताच शनिवारी तांडोर ग्रामस्थ व मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करुन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीतर्फे हर्षलचा नागरी सत्कार करण्यात आला.
मी जि.प शाळेत शिकलो. माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत घेतले. पहिल्या प्रयत्नात इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षेत भारतात पहिला आलो. आईचे आशीर्वाद व ग्रामस्थांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी हे यश प्राप्त करु शकलो. - हर्षल भोसले