आघाडीची घडी अखेर बसली!
By admin | Published: December 8, 2015 02:33 AM2015-12-08T02:33:39+5:302015-12-08T02:33:39+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडी करून लढण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सोमवारी केली.
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडी करून लढण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सोमवारी केली. यापैकी काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी ३ जागा लढवेल. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे मुंबईतील २पैकी १ जागा लढविली जाणार नाही.
विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची बैठक झाली. तीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करीत ७ जागांपैकी मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि नागपूर या ४ जागा काँग्रेसने तर सोलापूर, अहमदनगर, अकोला-बुलडाणा-वाशिम या ३ जागा राष्ट्रवादीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चारही जागांवरील उमेदवारांच्या नावाचा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ३ जागांपैकी सोलापूरमध्ये विद्यमान आमदार दीपक साळुंखे पाटील व अहमदनगरमधून अरुणकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला-बुलडाणा- वाशिम या जागेची उमेदवारी सोमवारी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मुंबईतील जागेसाठी काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा असतानाच विद्यमान आमदार भाई जगताप यांनी अर्ज दाखल केला. उमेदवारांची अधिकृत घोषणा बाकी असली तरी जगताप यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सेनेकडून मंत्री रामदास कदम यांनी मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल केला.