दानवे यांचा राजकीय प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:34 AM2019-05-31T03:34:54+5:302019-05-31T03:35:49+5:30
२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली
जालना : सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंतचा खा. रावसाहेब दानवे यांचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना केंद्रात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत.
जालना जिल्ह्यातील जवखेडा (ता. भोकरदन) येथे शेतकरी कुंटुंबात दानवेंचा जन्म झाला. वयाच्या २०व्या वर्षीच ते गावाच्या राजकारणात उतरले. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि भोकरदन पंचायत समितीचे सभापती झाले. नंतर १९८५ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु पहिल्यांदाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. १९९० मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांना पहिल्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. नंतर युतीच्या काळातही ते आमदार होते. पंचायतराज समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. दानवे पाचव्यांदा लोकसभेत गेले आहेत.
२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली. त्यात त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदा, महानगर पालिका तसेच विधासभा, विधान परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये चौफेर यश मिळवून भाजपला राज्यात क्रमांक एकचा राजकीय पक्ष म्हणून नावारूपास आणले.