पैसे महामंडळाचे, जमीन कदमांच्या नावे!
By admin | Published: June 10, 2015 02:53 AM2015-06-10T02:53:46+5:302015-06-10T02:53:46+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएसीचे प्रशिक्षण देण्यासाठी जमीन लाटल्याचे समोर आले आहे.
यदु जोशी, मुंबई
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएसीचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारण्याच्या नावाखाली औरंगाबादनजीक फतेपूर येथे जमीन खरेदी करण्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे.
या प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागेची खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी महामंडळाने तब्बल १० कोटी ७५ लाख रुपये मोजले. यातील प्रत्यक्षात अर्धा एकरच जमीन महामंडळाच्या नावावर आहे. उर्वरित जमीन ही तत्कालीन अध्यक्ष आणि आता राष्ट्रवादीचे आमदार असलेले रमेश कदम यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. या व्यवहारासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, हे विशेष!
वरील रकमेतील १ कोटी २५ लाख रुपये हे सिद्धी सोलार; पैठण या फर्मच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले. सिद्धी ही फर्म कदम यांच्या मुलीच्या नावे असल्याचे सामाजिक न्याय विभाग आणि तपास यंत्रणांकडे आलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे. महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक एस.के. बावने यांचाही या व्यवहारात सहभाग होता. आता ते निलंबित आहेत.
फतेपूरमधील जमिनीच्या मालकांना ठरलेली रक्कम देण्यात आली नाही. या रकमेतून कोणाच्या बंगल्याची वा जमिनीची खरेदी करण्यात आली याची चौकशी झाली तर आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.
रमेश कदम यांच्याशी संबंधित जोशाबा या बोरीवलीतील संस्थेस महामंडळाकडून कोट्यवधी रुपये देण्यात आले. महामंडळाच्या चेंबूर कार्यालयातील एक महिला अधिकारी या जोशाबा संस्थेशी संबंधित आहे आणि जोशाबाला रक्कम मिळवून देण्याच्या प्रक्रियेत तिचा मोठा वाटा होता, असे म्हटले जाते.
रमेश कदम यांचा राजकीय प्रवास विलक्षण आहे. बोरीवलीत एकेकाळी अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कदमांची आजची सांपत्तिक स्थिती अचंबित करणारी आहे. मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहारांमध्ये त्यांच्या आणि नातेवाइकांच्या जमिनी, घरे आदी संपत्तीची चौकशी आता एसीबी आणि सीआयडीने सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महागाई भत्त्याच्या
फरकाची रक्कम कोणाला?
आणखी एक धक्कादायक प्रकरण असे समोर आले आहे की, या महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची जी थकबाकी मिळाली त्यातील निम्मी रक्कम विशिष्ट व्यक्तींना देण्यात आली. ‘अर्धी रक्कम आम्हाला द्या तरच थकबाकी देऊ’ असे कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी पैसे दिले. कर्मचाऱ्यांनी ‘साहेबां’ंच्या पीएला दिलेल्या रकमांच्या पावत्याही त्यांना देण्यात आल्या. त्यावर या पीएच्या सह्या आहेत.