निवडणुकीसाठी गुजरातमधून पैसे
By admin | Published: October 13, 2014 05:32 AM2014-10-13T05:32:23+5:302014-10-13T05:32:23+5:30
कुठल्याही बाबतीत भाजपा उमेदवार मागे पडू नयेत, याकरिता अमित शहा यांनी १५ दिवसांपूर्वी मुंबईमधील गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची एक बैठक अहमदाबाद येथे आयोजित केली होती
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिष्ठेची केली असून, महाराष्ट्र भाजपाच्या उमेदवारांमागे आर्थिक बळ उभे करण्याचे आदेश गुजरात आणि मुंबईमधील गुजराती व्यापाऱ्यांना अमित शहा यांच्यामार्फत आल्याने गुजरातमधून महाराष्ट्राच्या निवडणुकीकरिता पैशांचा प्रचंड ओघ सुरू झाल्याची माहिती गुप्तचर खात्याच्या अहवालातून समोर आली.
कुठल्याही बाबतीत भाजपा उमेदवार मागे पडू नयेत, याकरिता अमित शहा यांनी १५ दिवसांपूर्वी मुंबईमधील गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची एक बैठक अहमदाबाद येथे आयोजित केली होती. या बैठकीला गुजरातच्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. अमित शहा यांनी मुंबई आणि महाराष्ट्र जिंकण्याकरिता भाजपाच्या उमेदवारांमागे आपली शक्ती उभी करा, असे आवाहन त्यांना केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
गुजराती व्यापारी महाराष्ट्र निवडणुकीकरिता रोख पैशांची वाहतूक करण्याकरिता त्यांच्या पूर्वापार असलेल्या अंगाडीयाच्या नेटवर्कचा वापर करीत आहेत. अंगाडीयामार्फत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची रोख रक्कम गुजरातमधून महाराष्ट्रात येत असावी, असा राज्य गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. मुंबईमधील गुजराती, मारवाडी व्यापारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पैशांची ताकद भाजपाच्या मागे उभी करीत आहेत. या निवडणुकीत शिवसेना हा क्र मांक १चा शत्रू आहे; आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपा शिवसेनेच्या पुढे राहिला पाहिजे, असे निर्देश भाजपाच्या गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या नेत्यांकडून त्यांच्या समाजापर्यंत पोहोचवले गेले आहेत. (प्रतिनिधी)