मतिमंदांचा सांभाळ करणाऱ्यांना अर्थसाह्य
By admin | Published: June 8, 2017 01:27 AM2017-06-08T01:27:56+5:302017-06-08T01:27:56+5:30
महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी पालकांना व हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अर्थसाहाय्य देण्यात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी पालकांना व हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अर्थसाहाय्य देण्यात येणार असून, त्या अंतर्गत १२० पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य अदा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १४ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. प्रभाग क्र. ८ दत्तनगर झोपडपट्टीमध्ये जुने ब्लॉक पाडून २६ सीट्सचे शौचालय बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या ई-निविदा प्रणालीसाठी डिजिटल की पुरवठा व नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १८ लाख १९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
२०१७-१८ चा वित्तीय वर्षात १० वी व १२ वीतील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या १२७ पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी येणाऱ्या सुमारे १५ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.