पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी : आमदार बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:17 PM2019-07-22T13:17:09+5:302019-07-22T13:18:44+5:30
केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या तिकीट देणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत प्रश्न विचारला पाहिजे.
पुणे : पैसा असल्याशिवाय निवडणुकीत माणूस निवडून येत नाही. ही परिभाषा आता झाली आहे. पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी रविवारी व्यक्त केले.
माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून आदर्श कार्यकर्ता गौरव समितीचा पहिला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आमदार बच्चू कडू यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कडू बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विपश्यना मार्गदर्शक दत्ता कोहिनकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप, कार्याध्यक्ष विजयकुमार मर्लेचा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेकांना गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बच्चू कडू म्हणाले, ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांवर आहे. केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या तिकीट देणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. दरम्यान, सध्याच्या काळात कार्यकर्ता मिळणेही अवघड झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत कार्यकर्ता टिकणे आवश्यक आहे. आता नेता बनणे सोपे झाले आहे. अलीकडील राजकारणात विकृती आली आहे. हे संपविण्याचे काम कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. बच्चू कडूची आंदोलने म्हणजे अधिकाऱ्यांना मारहाण करणे, हा माध्यमांमुळे लोकांपुढे मांडलेला माझा चेहरा आहे. मात्र, अन्य मार्गानेही आम्ही आंदोलने करतो. रस्ता होत नाही, म्हणून रक्तदान करून आंदोलने केली, ते जनतेसमोर आले नाही. त्यामुळे माध्यमे दाखवतात तोच चेहरा लोकांसमोर येतो.
यावेळी उल्हास पवार, कोहिनकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
..........