प्राप्तिकर खात्याची नजर निवडणूक खर्चावर

By Admin | Published: January 21, 2017 12:30 AM2017-01-21T00:30:12+5:302017-01-21T00:30:12+5:30

उमेदवारांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर थेट प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वॉच ठेवण्याचा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे.

Monitoring of Income Tax Department on Election Expenditure | प्राप्तिकर खात्याची नजर निवडणूक खर्चावर

प्राप्तिकर खात्याची नजर निवडणूक खर्चावर

googlenewsNext


नाशिक : निवडणूक काळात प्रचंड प्रमाणात होणारा पैशांचा वापर रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर थेट प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वॉच ठेवण्याचा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने त्यासाठी प्राप्तिकर खात्यातील पाच अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे, निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर करणारा उमेदवार आता थेट प्राप्तिकर खात्याच्या कचाट्यात सापडणार आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रक समितीची बैठक झाली. या वेळी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होत असतो. त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच प्राप्तिकर खात्याच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती करत वेगळा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील दहाही महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यात नाशिक महापालिकेसाठी आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकारी धुळे येथील बी. एस. झाला, मालेगाव येथील संजयकुमार सिंग, औरंगाबाद येथील अनिमेश नासकर, जळगाव येथील एस. एच. मेंढे, औरंगाबाद येथील मनीषकुमार सोनी यांचा समावेश आहे. सदर निरीक्षक उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नजर ठेवणार असून, बॅँक खात्यातील उलाढालीवरही त्यांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, निवडणूक काळात बाहेरून मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा येत असल्याने त्यालाही पायबंद घालण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्याची सूचना राज्य उत्पादन शुल्क खात्याला करण्यात आली. शहरातील नऊ ठिकाणी प्रवेशद्वारांवर बाहेरून येणाऱ्या मद्यसाठा, पैसा यावर नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय, शहरात सध्या आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासाठी तूर्त सहा भरारी पथके कार्यान्वित करण्याचे आदेशित करण्यात आले तर पुढे निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारादरम्यान त्यांची आणखी संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले.
या वेळी आचारसंहिता कक्षप्रमुख सरिता नरके, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण,
प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आयकर खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या

Web Title: Monitoring of Income Tax Department on Election Expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.