वन कर्मचा-यांना चुकवताना माकडाचा खाली पडून मृत्यू

By admin | Published: July 6, 2016 01:26 PM2016-07-06T13:26:09+5:302016-07-06T13:26:09+5:30

माकडाच्या अनेक गंमतीशीर, सुरस कथा आपण वाचल्या असतील. पोट धरून हसलाही असाल, पण अशीच एखादी काल्पनिक कथा प्रत्यक्षात घडली तर.

Monkey falls down after he misses forest staff | वन कर्मचा-यांना चुकवताना माकडाचा खाली पडून मृत्यू

वन कर्मचा-यांना चुकवताना माकडाचा खाली पडून मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. ६ - माकडाच्या अनेक गंमतीशीर, सुरस कथा आपण वाचल्या असतील. पोट धरून हसलाही असाल, पण अशीच एखादी काल्पनिक कथा प्रत्यक्षात घडली तर... हे घडले आहे बार्शी तालुक्याच्या खामगावात... माकडाच्या उच्छादाने जगणे हराम करून सोडल्याची तक्रार कोणा ग्रामस्थाने आपले सरकार पोर्टलवर टाकली. 
 
त्याची तातडीने दखल घेतली गेली. जिल्ह्यापासून गावापर्यंतची प्रशासकीय यंत्रणा हलली. माकडाची धरपकड सुरू झाली. गावभर पोराटोरांचा हुर्यो चालला आणि भेदरलेले माकड इकडून तिकडे उड्या मारताना मरण पावले.  या घटनेमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. माकडाच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नाही हे पटवण्यासाठी जाब-जबाब, पंचनामे, अहवालांची जंत्री सुरू झाली.
 
सहा महिन्यांपासून गावात एका माकडाने धुडगूस चालवला आहे. लोकांना फिरणेही मुश्कील करून टाकले आहे. या माकडाचा बंदोबस्त करावा अशी तक्रार रवींद्र पंडित मुठाळ या ग्रामस्थाने आपलं सरकार या पोर्टलवर टाकली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि माकडाला पकडण्याचे ऑनलाइन फर्मान सोडले. आदेश मिळताच जिल्हा प्रशासन कामाला लागले. 
 
तालुका पातळीवरून लगोलग वनक्षेत्र अधिकारी, माकड पकडण्यात तरबेज माणसांना घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश निघाले. पाठोपाठ एका पहाटेच हा फौजफाटा गावात दाखल झाला. माकड गावात नव्हते. कोणीतरी ते शेतातील झाडावर असल्याचे सांगितले. सगळा लवाजमा शेताकडे पळाला. चार तरबेज माणसांनी माकड पकडण्यासाठी युक्ती लढवल्या. 
 
दोघे त्याला हुसकावत होते, तर दोघे सापळ्यात येण्याची वाट पाहत होते. या सगळ्या गोंधळात माकडाने धूम ठोकली आणि गाव गाठले. गावात तर जत्राच जमली. घरे, वाड्यांवरून माकडाच्या उड्या सुरू झाल्या.
 
तेवढ्यात घाबरलेले माकड एका घरावरून दुसऱ्या घरावर उडी मारताना खाली पडले. सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कर्मचारी माकड पडण्यासाठी जवळ गेले, पण त्याची काहीच हालचाल होत नव्हती. चिखर्डेच्या पशूवैद्यकीय रुग्णालयात त्यांनी माकडाला नेले. तपासून डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पण हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून माकडाच्या मृत्यूस आम्ही जबाबदार नसल्याचे दाखवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली. 
 
वनपरिमंडळ अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिस पाटील, ग्रामस्थांचे जबाब घेतले. पांगरीच्या वन परिमंडळ अधिकाऱ्यांनी माकडाच्या दहनविधीच्या पंचनाम्याची प्रत, पशुधन अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल, मृत माकड अंत्यविधीचे फोटो असा सगळा दस्तऐवज तयार करण्यात आला. माकडाच्या मृत्यूमध्ये वन कर्मचाऱ्याची कोणतीही चूक नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला.
 

Web Title: Monkey falls down after he misses forest staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.