एकहाती सरकार, दोन हातांनी भ्रष्टाचार
By admin | Published: July 10, 2015 11:54 PM2015-07-10T23:54:42+5:302015-07-10T23:54:42+5:30
नारायण राणे : रत्नागिरीतील मोर्चाप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह युती सरकारवर घणाघाती आरोप
रत्नागिरी : राज्यातील भाजप - सेना युतीचे सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. एकहाती सत्ता मागणारे आता दोन हातांनी भ्रष्टाचार करीत आहेत. शेतकरी कर्जमुक्तीची आस लावून बसला आहे. कोकणातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारी पैशांवर अमेरिका वारीच्यावेळी रोमॅन्टीक गाण्याच्या तालावर थिरकत होते. असे करून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. राज्य सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी जिल्हा कॉँग्रेसने मोर्चाद्वारे हल्लाबोल केला. त्यावेळी मोर्चेकऱ्यांना राणे यांनी संबोधित केले.
कॉँग्रेस भवन येथून दुपारी १२ वाजता निघालेला कॉँग्रेसचा मोर्चा १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी राणे यांच्यासोबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, विधानपरिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, राज्यातील भाजप - सेना युती सरकारच्या काळात कोकणातील जनता व शेतकरी महागाईच्या चरकात पिळून निघत आहेत. आंबा कर्जमुक्ती, डिझेल परतावा, वाळू - खडी - जांभा दगड प्रश्न प्रलंबित आहे. रेशनवर धान्य नाही. अंगणवाडी सेविकांना मानधन नाही. सागरी नियमन कायद्याचा प्रश्न जैसे थे आहे. मच्छीमारांचे प्रश्नही प्रलंबित आहेत. असे असताना भ्रष्टाचाराची पंकजा चिक्की चर्चेत आहे. तावडेंच्या बोगस पदवीबरोबरच त्यांच्या दहावीतील परीक्षेवरूनही वादळ माजले आहे. राज्यात भूकबळी जात आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. खून, दरोडे, बलात्कार वाढले आहेत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत केलेली मौजमजा म्हणजे ‘जनता त्रस्त, मुख्यमंत्री मस्त’ अशीच म्हणावी लागेल. कोकणातील अनेक विकास प्रश्न तसेच आहेत. सी-वर्ल्ड, विमानतळ, रेडी बंदर, चौपदरीकरण, पाटबंधारे प्रकल्प ही सगळी विकासकामे ठप्प झाली आहेत. (प्रतिनिधी)
नारायण राणे म्हणाले...
४नको तेथे पैसा उडवल्याने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पास ४० टक्क्यांनी कात्री लागणार.
४पाटबंधारेच्या ५७० योजना रद्द केल्याने कोकणातील पाटबंधारे प्रकल्प बंद होणार.
४आजच्या मोर्चाने कॉँग्रेस कार्यकर्त्यांना आॅक्सिजन मिळाला आहे.
४पर्यावरणमंत्री म्हणवणाऱ्या रामदास कदम यांना जी. डी. पी., पर्यावरण या शब्दांचा अर्थ काय ते विचारा...
४राज्यभर दौरे करून भाजप सरकारचा पंचनामा करणार.
४बाळासाहेब ठाकरे व उध्दव यांच्यात जमीन अस्मानाचा फरक.
जिल्हा परिषद कर्जबाजारी!
शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट दिले गेले आहे. एवढे पैसे महिना यायलाच हवेत. नार्वेकर कलेक्शन करणार. त्यामुळे या मंत्र्यांकडून कामाची काय अपेक्षा करणार? पूर्वीची शिवसेना आता राहिलेली नाही. २० वर्षांपासून यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. विकास सोडाच यांनी जिल्हा परिषदच कर्जबाजारी करून ठेवली आहे, आरोप राणेंनी केला.