मोनोरेलची टक्कर टळली
By admin | Published: July 9, 2017 03:12 AM2017-07-09T03:12:07+5:302017-07-09T03:12:07+5:30
चेंबूर-वडाळा मार्गावर धावणाऱ्या मोनोरेल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेंबूर येथे एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या पण सुदैवाने टक्कर टळली. या दुर्घटनेत
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चेंबूर-वडाळा मार्गावर धावणाऱ्या मोनोरेल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेंबूर येथे एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या पण सुदैवाने टक्कर टळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ट्रॅकवर आलेल्या मोनोमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या जवानांनी तातडीने मदककार्य सुरू करत प्रवाशांची सुटका केली. दरम्यान, एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल समोरासमोर आल्याने मोनोच्या अत्याधुनिक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल (महालक्ष्मी) असा मोनोरेल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोनोरेलचा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील चेंबूर-वडाळा या मार्गावर मोनोरेल धावते आहे. तर वडाळा-जेकब सर्कल (महालक्ष्मी) या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. मोनोचा दुसरा टप्पा पावसाळ्यापूर्वी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने हा टप्पा नव्या वर्षातच मार्गी लागणार आहे. परिणामी, पहिला टप्पा प्रवाशांना दिलासा देत असतानाच शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेंबूर मोनोरेल स्थानकाजवळ एकाच ट्रॅकवर मोनोरेल समोरासमोर आल्या. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच घटनास्थळी उपस्थित पोलिसांसह जवानांनी त्यांना दिलासा देण्याचे काम केले.
दुसरीकडे या घटनेमुळे मोनोरेलच्या सेवेवर विपरीत परिणाम झाला. मोनोरेलची सेवा पूर्णत: खंडित झाली. रविवारी सकाळी मोनोरेल सेवा पूर्ववत होईल, असाही दावा प्राधिकरणाने केला.
मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च करून मोनोरेल प्रकल्प उभारण्यात आला. चेंबूर ते वडाळा या सुमारे नऊ किलोमीटर मार्गावर सात स्थानके आहेत. २००९ साली मोनोरेल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. १ फेब्रुवारी २०१४ रोजी मोनोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मोनोरेलचा पुढील टप्पा वर्षभरात सुरू होण्याची अपेक्षा आहे.
एमएमआरडीए म्हणे टक्कर झालीच नाही...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकरणी सारवासारव केली आहे. दोन्ही मोनोरेल समोरासमोर आलेल्या नाहीत, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. चेंबूर दिशेकडे जाणाऱ्या मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव ही समस्या निर्माण झाली. परिणामी, घटनास्थळी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनो पाठविण्यात आल्याचे प्राधिकरणाकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले.