मोनोरेल लटकली!
By Admin | Published: March 16, 2015 03:50 AM2015-03-16T03:50:47+5:302015-03-16T04:08:16+5:30
रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने वडाळा-चेंबूर मार्गावर धावणारी मोनोरेल भक्ती पार्क स्थानकाजवळ चक्क बंद पडण्याची घटना घडली.
मुंबई : रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने वडाळा-चेंबूर मार्गावर धावणारी मोनोरेल भक्ती पार्क स्थानकाजवळ चक्क बंद पडण्याची घटना घडली. सुदैवाने घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी उंच शिडीच्या मदतीने मोनोमधील १० प्रवासी आणि कॅप्टनला सुमारे अडीच तासांनंतर साडेदहाच्या सुमारास सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर मोनोरेल तब्बल चार तास खोळंबली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती रुळावर नियमित धावू लागली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-महालक्ष्मी या मोनोरेल मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील वडाळा ते चेंबूर हा मार्ग वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आला असून, चेंबूर ते महालक्ष्मी या मोनोरेल मार्गाचे काम सुरू आहे. वडाळा ते चेंबूर हा मोनोरेल मार्ग सुरू होऊन वर्ष उलटून गेले तरी या मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. (प्रतिनिधी)