पावसाळ्याचे खमंग बेत

By Admin | Published: July 24, 2016 02:44 AM2016-07-24T02:44:17+5:302016-07-24T02:44:17+5:30

पावसाळा म्हटला की, चमचमीत पदार्थ खावेसे वाटू लागतात. पिकनिकचे बेत तर रंगतातच, पण अनेक घरात भजीपार्टीही होते. धुंद पावसात चहाबरोबर गरमारगम भजी खाण्याची मज्जा काही औरच.

Monsoon | पावसाळ्याचे खमंग बेत

पावसाळ्याचे खमंग बेत

googlenewsNext

- भक्ती सोमण

पावसाळा म्हटला की, चमचमीत पदार्थ खावेसे वाटू लागतात. पिकनिकचे बेत तर रंगतातच, पण अनेक घरात भजीपार्टीही होते. धुंद पावसात चहाबरोबर गरमारगम भजी खाण्याची मज्जा काही औरच.

आषाढ महिना सुरू आहे. या आषाढाच्या पावसाची मजा काही औरच असते. श्रावणात तर सणांच्या साथीने कोसळणारा पाऊस निसर्गाची मनमुराद उधळण करतो. या निसर्गाच्या सानिध्यात भिजायला तर अनेकांना आवडतं. पिकनिकचे बेत रंगतात, पण ही पिकनिक काय किंवा अख्खा पावसाळा म्हटले तरी चालेल, ‘भजी’ खाल्ल्याशिवाय केवळ अपूर्णच. आमच्याकडे दर पावसाळ््यात भजीपार्टीचा बेत रंगतो. त्याची सगळी सूत्र माझ्या बाबांकडे असतात. तसा शिरस्ताच गेली काही वर्षे आहे. अर्थात, आई आणि मी मदत करतोच. तर भजीसाठी भरपूर कांदे आणि बटाटे चिरायचे आणि त्याला थोडसं तिखट, मीठ लावून ठेवायचं. करायच्या वेळी डाळीच्या पिठात मीठ, तिखट एकत्र करून त्यात ही भजी तळायची. नुसती तर नुसती नाहीतर पावाबरोबरच. बाहेर कोसळणाऱ्या पावसात ही मस्त तिखट, चविष्ट भजी खाणं म्हणजे स्वर्गीय सुख, नाही का! पण मिरच्यांच्या भजीशिवाय गंमत येणारच नाही, अशी एक पुडी केदार, जयेश या माझ्या भावांनी सोडली की, बाबा लगेच उत्साहाने त्यातल्या त्यात पटकन मिरच्यांची भजी करतात. ही भजीपार्टी कुटुंबाला एकत्र मजा-मस्तीचे कुरकुरीत क्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशी ही भजीपार्टी अनेक घरांत रंगत असावी. कांदा, बटाटाबरोबरीने घोसाळी, वांगी, ओव्याच्या पानांची भजी मजा आणते.
भज्यांबरोबरच या कालावधीत मका मोठ्या प्रमाणात मिळतो. भर पावसात मक्याचं कणीस खाणे नेहमीच अनेकांना आवडते. याशिवाय नुसता शिजवलेल्या मक्यात मीठ, लिंबू पिळूनही आजकाल सर्रास खाल्ला जातो. याशिवाय मक्याची भजी, मक्याचे पॅटीस, परोठा, रोल असे कितीतरी प्रकार या कालावधीत केले जातात.
परदेशात फळांचा वापर करून आपल्या भजीप्रमाणे ‘फ्रिटर्स’ हा पदार्थ केला जातो. नाव जरी कठीण वाटत असले, तरी त्याचे सामान अगदी सहज उपलब्ध होणारे आहे. यासाठी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैदा, साखर, दूध हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं(भजीसाठी डाळीचे पीठ भिजवतो तसे). मग त्यात सफरचंद, केळ, पपनस अशी कोणतीही आवडीची फळे घेऊन ती वरच्या मिश्रणात घोळवून घेऊन, तेल अथवा तुपात तळायची. त्यात आवडीनुसार वेलची पावडर, केशरही घालता येते. ते चॉकलेट सॉस वा टॉमेटो सॉसबरोबरही छान लागते. मैदा नको असेल, तर त्याऐवजी तुम्ही इतर पिठांचा वापर करता येऊ शकतो. हे पदार्थ मुलांना जास्त आवडतात. त्यामुळे पावसाळ््यात भज्या करताना एक वेगळा पर्याय म्हणून ‘फ्रिटर्स’ करण्याचा विचार करता येईल. पावसाळ््याची ही कुरकुरीत मजा खरं तर नेहमीच करता येते, पण त्याचा खरा आणि मनमुराद आनंद हा पावसाळ््यात घेण्यात खरं समाधान आहे. म्हणून तर घरीच नाही, तर अगदी आॅफिसमध्येही भजी खाण्याचे बेत रंगतात. मग तुम्हीही करताय का प्लॅन, अशा भजी पार्टीचा!

हटके पर्याय : या पावसाळ््यात एक वेगळा पर्याय म्हणून चायनिज पदार्थ असलेल्या ‘मोमोज’चाही विचार करायला हरकत नाही. आपण उकडीचे मोदक करतो, त्याप्रमाणेच मैद्याचा छोटा गोळा लाटून त्यात कोबी, मिरची आणि लसूण एकत्र करून केलेले सारण भरले जाते व ते उकडवले जाते. यात आता कोणत्याही प्रकारच्या भाज्यांमध्ये आलं-लसणाची पेस्ट वा तुकडे मिक्स करून ते सारणही भरून दिले जाते. सध्या चिज मोमोजही खूप लोकप्रिय आहेत. काही मोमोज केळीच्या पानांवरही स्टीम केले जातात. या मोमोजना ‘डंम्पलिंग’ असेही म्हटले जाते. मोदकात पारी जाड असते, पण मोमोजमध्ये ती पातळसर असते. हे मोमोज शेजवान चटणीबरोबर खायला जास्त टेस्टी लागतात, पण बदल म्हणून ते चटणीबरोबरही देता येतील. त्यामुळे पावसाळ््यात जरा हटके म्हणून मोमोजचा विचार कराच.

Web Title: Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.