मान्सून ९८ टक्के
By admin | Published: June 7, 2017 04:45 AM2017-06-07T04:45:14+5:302017-06-07T04:45:14+5:30
मान्सूनचे आगमन काहिसे लांबणार असल्याच्या बातमीने हिरमोड झाला असला तरी राष्ट्रीय हवामान विभागाने मंगळवारी एक खुशखबर दिली
पुणे : मान्सूनचे आगमन काहिसे लांबणार असल्याच्या बातमीने हिरमोड झाला असला तरी राष्ट्रीय हवामान विभागाने मंगळवारी एक खुशखबर दिली आहे. यंदाचा मान्सून हा सरासरीच्या ९८ टक्के होणार असल्याचे जाहीर केले आहे. हवामान विभागाने १८ एप्रिल रोजी दिलेल्या अंदाजानुसारे मान्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते़
जून ते सप्टेंबर या चार महिन्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने जाहीर केला असून तो सर्वसाधारण आहे़ उत्तर पश्चिम भारतात ९६ टक्के मान्सून बरसणार असून मध्य भारतात त्याचे प्रमाण १०० टक्के असेल़ दक्षिण भारत व द्वीपकल्पात ९९ टक्के असून उत्तर -पूर्व भारतात ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ या मॉडेलनुसार त्यात ८ टक्क्यांपर्यंत कमीजास्त होण्याची शक्यता आहे़ याशिवाय संपूर्ण देशभरात जुलैमध्ये ९६ टक्के आणि आॅगस्टमध्ये ९९ टक्के पाऊस पडू शकतो़
सीईएफएस या मॉडेलचा आधार घेऊन संपूर्ण देशासाठीचा हा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने ६ घटकांचा समावेश आहे़ पॉसिफिक आणि भारतीय समुद्राच्या पाण्याच्या तापमानाचा परिणाम एल निनोवर होत असतो़ हा परिणाम मान्सूनवर सहा -सात वर्षांपासून होत असल्याचे दिसून आले आहे़ या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात एल निनो कमकुवत असल्याने त्याचा परिणाम होणार नाही़
या मॉडेलच्या ५ घटकांनुसार यंदा कमी म्हणजे ९० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता केवळ ७ टक्के असून सर्वसाधारणपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता २८ टक्के आहे़ सर्वसाधारण म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त ५० टक्के आहे़
।कोकण, गोव्यात मुसळधार
गेल्या ३० मेपासून केरळमध्ये रेंगाळलेल्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मंगळवारी सुरु झाली़ मॉन्सून दक्षिण अरबी समुद्राच्या व लक्षद्वीपच्या उर्वरित भागात, बहुतांश भागात तर नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या व तामिळनाडूच्या आणखी काही भागात झाली आहे़ कोकण, गोवा व विदर्भात गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़