केरळात यंदा लवकर दाखल होणार मान्सून
By admin | Published: May 14, 2016 02:57 AM2016-05-14T02:57:15+5:302016-05-14T02:57:15+5:30
वाढत्या तापमानामुळे अंंगाची काहिली होत असल्याने पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना यंदा मान्सून काहीसा अगोदरच चिंब भिजविणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविणारी खासगी संस्था स्कायमेटने हा दावा केला आहे.
नवी दिल्ली : वाढत्या तापमानामुळे अंंगाची काहिली होत असल्याने पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना यंदा मान्सून काहीसा अगोदरच चिंब भिजविणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविणारी खासगी संस्था स्कायमेटने हा दावा केला आहे. त्यानुसार मान्सून दोन ते तीन दिवस अगोदरच केरळात दाखल होणार आहे. मान्सून २८ ते ३० मे दरम्यान केरळात दाखल होईल.
हवामानाचे हे अंदाज चालू वर्षात मान्सूनची सुरुवात चांगली राहील असे संकेत देत आहेत. सर्वसाधारणपणे मान्सून येण्याची तारीख १ जून ही समजली जाते.
या दिवशी मान्सून केरळात दाखल होतो. मान्सून लवकर आल्यास जिथे दुष्काळी परिस्थिती व पाण्याची टंचाई आहे, त्या भागांना दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान खात्यानंतर स्कायमेटनेही मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहील असा अंदाज वर्तविला आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना मान्सूनच्या लवकरच आगमनाचा हा सांगावा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा आहे. (वृत्तसंस्था)
> मान्सून चार दिवसांत निकोबार बेटांवर धडकणार
पुणे : बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तीन ते चार दिवसांत मान्सून निकोबार बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मान्सूनचा वेग वाढेल, अशी माहिती ‘आयएमडी’च्या च्या संचालिका (हवामान) सुनीता देवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मान्सून साधारणपणे १५ मेपर्यंत निकोबार बेटांवर आणि त्यानंतर २० मेपर्यंत अंदमानात दाखल होतो. सध्या त्याची वाटचाल नियमित वेळेप्रमाणे होत आहे. शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर भारतात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. त्यामुळे १६ किंवा १७ मेपर्यंत मान्सून निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.
सुनीता देवी म्हणाल्या, सध्या दक्षिणेकडून वाहणारे वारे मान्सूनचे आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर वाऱ्यांचा वेग वाढेल. ढगांच्या निर्मितीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. परंतु मान्सून केरळ किनारपट्टीवर नेमका कधी दाखल होणार, हे आताच सांगता येणार नाही.