Monsoon Rain News: चिंब भिजण्यास तयार रहा! मान्सून... कमिंग सून; सहा दिवस आधीच राज्यात दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:35 AM2022-05-14T06:35:30+5:302022-05-14T06:35:57+5:30
राज्यात साधारणपणे मान्सून ७ किंवा ८ जून रोजी तळकोकणात दाखल होतो; पण यंदा त्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क । पुणे : उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्यांसाठी आनंदवार्ता आहे. नेहमीपेक्षा ४ दिवस आधीच, म्हणजे २७ मे रोजी, मान्सून केरळात धडकणार असून राज्यात १ जून रोजी पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाचे डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
विनाअडथळा प्रवास
राज्यात साधारणपणे मान्सून ७ किंवा ८ जून रोजी तळकोकणात दाखल होतो; पण यंदा त्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. उत्तरेकडे सरकताना मान्सूनचा वेग मंदावतो. मात्र, मान्सूनच्या प्रवासात सध्या तरी कोणतेही अडथळे दिसत नाहीत. त्यामुळे तो किमान सहा दिवस लवकर राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात वळवाची शक्यता
विभागाने मे महिन्याच्या दिलेल्या अंदाजानुसार देशात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत तसा पाऊस झालेला नाही. दक्षिणेकडील राज्यांत तो जोरदार कोसळला आहे. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९% पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्याचा अंदाज मेअखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यात सबंध देशात पावसाचे वितरण कसे असेल याचा अंदाज दिला जाईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
- डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक,
हवामान विभाग
वर्ष अंदाज आगमन
२०१७ ३० मे ३० मे
२०१८ २९ मे २९ मे
२०१९ ६ जून ८ जून
२०२० ५ जून १ जून
२०२१ ३ जून ३१ मे