मान्सून आज येतोय!
By admin | Published: June 6, 2014 12:31 AM2014-06-06T00:31:35+5:302014-06-06T00:31:35+5:30
प्रवासात आलेले अडथळे दूर करत मान्सूनची मजल दरमजल सुरूच असून, शुक्रवारी (6 जून) अखेर तो केरळात दाखल होणार आहे.
Next
>केरळात आगमन : हवामान अनुकूल, प्रवास वेगात सुरू
मुंबई : प्रवासात आलेले अडथळे दूर करत मान्सूनची मजल दरमजल सुरूच असून, शुक्रवारी (6 जून) अखेर तो केरळात दाखल होणार आहे.
अंदमान निकोबार ओलांडल्यानंतर कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मान्सूनचा प्रवास थांबला होता. किमान दीड आठवडा मान्सून एकाच जागेवर होता. मात्र कमी दाबाचा पट्टा विरून गेल्यानंतर मान्सूनने पुन्हा जोर पकडला आहे. आता तो वेगाने पुढे सरकत आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा कायम आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस पुढील 24 तासांत केरळ, दक्षिण अरबी सागराचा आणखी काही भाग, मालदीव-कॉमोरीनचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. शिवाय ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढील 24 तासांत मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.
कोकण-गोव्याच्या उर्वरित ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. शिवाय विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट होती. मराठवाडय़ाच्या काही भागांत, विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे.
लक्षद्वीप येथे पडलेला पाऊस, अरबी समुद्रातील वारे आणि मान्सूनचा वेग यावर मान्सूनचा पुढील प्रवास वर्तविला जात आहे. मुळात केरळातच मान्सून विलंबाने दाखल होत आहे. परिणामी, महाराष्ट्रात तो सरासरीच्या तुलनेत विलंबाने दाखल होईल.