मान्सूनचा जोर कायम; आजही कोसळधारा, नदी-नाल्यांना पूर, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 06:20 AM2021-08-20T06:20:25+5:302021-08-20T06:20:50+5:30

Monsoon : मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाचा अधूनमधून मारा सुरू होता. मुंबईत पावसामुळे पाच ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. आठ ठिकाणी झाडे कोसळली. 

Monsoon continues; Even today, landslides, floods in rivers and streams, traffic disrupted | मान्सूनचा जोर कायम; आजही कोसळधारा, नदी-नाल्यांना पूर, वाहतूक विस्कळीत

मान्सूनचा जोर कायम; आजही कोसळधारा, नदी-नाल्यांना पूर, वाहतूक विस्कळीत

Next

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, विदर्भ व लगतच्या दक्षिण छत्तीसगढवर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा मान्सूनच्या नोंदीने चढा आलेख गाठला आहे.  

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाचा अधूनमधून मारा सुरू होता. मुंबईत पावसामुळे पाच ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. आठ ठिकाणी झाडे कोसळली. 
कांदिवली पूर्व येथील पोईसरमधील कमलेश कम्पाउंडमधील सार्वजनिक शौचालयाचा भाग कोसळला. यात तिघे जखमी झाले. 
मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले. जालन्यात दुधना, कुंडलिका नद्यांना पूर आला आहे. परतूर येथील निम्नदुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातही बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. कन्नड तालुक्यात गेल्या २४ तासांत  आठपैकी पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणीतील पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्याने ६ गावांचा संपर्क तुटला होता. हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. 

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसाने नदी, नाले 
ओसंडून वाहू लागले असून, महागाव तालुक्यात एका शेतकऱ्याचा पुरात मृत्यू झाला. उमरखेड तालुक्यातील शिवराजनगर तांड्याला पुराचा  वेढा पडला. उमरखेड-पुसद मार्गावरील दहागाव नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर मुडाणा येथे पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. 
मेहकर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गडचिरोली, भंडारा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. नाशिक आणि खान्देशातही बहुतांश ठिकाणी पावसाचे दमदार पुनरागमन झाले. इकडे कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली.  

कोकण, मराठवाडा, विदर्भात आजही पाऊस 
शुक्रवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २१ ऑगस्ट रोजीही राज्यभरात असेच हवामान राहील.  

या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहील.

Web Title: Monsoon continues; Even today, landslides, floods in rivers and streams, traffic disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.