मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला, तरीही पावसाची मात्र हुलकावणी; मुंबईकर उकाड्याने हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:49 AM2022-06-16T05:49:05+5:302022-06-16T05:49:20+5:30
अर्ध्या महाराष्ट्रावर स्वार झालेल्या वरुणराजाने काही ठिकाणी अद्यापही हुलकावणी दिली आहे.
मुंबई :
सिंधुदुर्गनंतर रायगड, मुंबई आणि ठाणे काबीज करत मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे आपली घौडदौड सुरू ठेवली असली, तरी अर्ध्या महाराष्ट्रावर स्वार झालेल्या वरुणराजाने काही ठिकाणी अद्यापही हुलकावणी दिली आहे. विशेषत: मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या पाच दिवसापासून पाठ फिरवल्याने मुंबई आजही कोरडीच आहे. त्यात उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा नागरिकांचा जीव काढत असून, वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबईकर चातकासारखे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्रात १ ते १५ जूनदरम्यान सरासरी ७६.२ मिमी पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात मात्र आजवर ही नोंद ३२.५ मिमी असून, पडलेला पाऊस उणे ५७ टक्के आहे. विभागवार आकडेवारीनुसार, कोकण आणि गोव्यात सरासरी २३४.५ मिमी पावसाची नोंद अपेक्षित होते, परंतु आजवर केवळ ९९.४ मिमी पाऊस पडला आहे.
५८ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी ६४.३ मिमी पावसाची अपेक्षा असतानाच २८.३ मिमीची नोंद झाली असून हा पाऊस ५६ टक्के आहे. मराठवाड्यात ४१.४ मिमी एवढा पाऊस झाला असून प्रत्यक्षात सरासरी ५९.८ मिमी एवढा पाऊस पडतो. हा पाऊस फक्त ३१ टक्के आहे. विदर्भात १६.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, येथे सरासरी प्रत्यक्षात ५६.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यावेळी केवळ ७१ टक्के एवढा पाऊस पडला आहे.
मराठवाड्यात दाखल
मान्सून मराठवाड्याच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा प्रवास
१६ ते १९ जून : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.
१६ जून : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.
१८ जून : कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपटटीवर सोसाट्याचा वारा वाहील.
१ ते १५ जूनपर्यंतचा पाऊस
मुंबई शहर
टक्के : उणे ५४
प्रत्यक्ष : ८३.५ मिमी
सरासरी : १८२.९ मिमी
मुंबई उपनगर
टक्के : ४३
प्रत्यक्ष : ३१६३.४ मिमी
सरासरी : २२०५.८ मिमी