वेग मंदावल्याने मान्सून लांबणीवर
By Admin | Published: May 25, 2015 03:46 AM2015-05-25T03:46:53+5:302015-05-25T03:46:53+5:30
अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेला मान्सून २१ मे रोजी काही अंशी पुढे सरकला खरा; पण त्यानंतर आता त्याचा पुढील प्रवास मंदावला आहे.
मुंबई : अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेला मान्सून २१ मे रोजी काही अंशी पुढे सरकला खरा; पण त्यानंतर आता त्याचा पुढील प्रवास मंदावला आहे. मागील तीन दिवसांपासून मान्सूनची उत्तरेकडील सीमा कायम आहे. येत्या तीन दिवसांत मान्सूनचा पुढील प्रवास पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यावर आलेली उष्णतेची लाटही कायम असून विदर्भाला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल झालेली नाही. त्यामुळे २१ मे रोजी असलेली नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा आजही कायम आहे. त्यानुसार, नैऋत्य मौसमी पावसाने संपूर्ण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग व नैऋत्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. पुढील तीन दिवस नैऋत्य मौसमी पावसाचे दक्षिणेकडील अरबी समुद्राचा आग्नेय भाग, मालदीव-कॉमोरिनचा भाग व दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तरेकडून महाराष्ट्रावर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा वेग कायम आहे. परिणामी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. शिवाय येथील उष्णतेच्या लाटेत भरच पडत असून, त्यामुळे उष्माघाताचे बळी वाढत आहेत. विदर्भातील उष्ण लाटेसह कोकण-गोव्याच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.(प्रतिनिधी)