मान्सून एक्स्प्रेस मुंबईत दाखल...
By admin | Published: June 13, 2017 06:36 AM2017-06-13T06:36:22+5:302017-06-13T06:36:22+5:30
मान्सून एक्स्प्रेस अखेर सोमवारी मुंबईत येऊन धडकली. मागील आठवडाभरापासून मुंबापुरीत कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर
- मान्सून एक्स्प्रेस अखेर सोमवारी मुंबईत येऊन धडकली. मागील आठवडाभरापासून मुंबापुरीत कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळीच दाखल झालेल्या मान्सूनच्या ढगांच्या आगमनासह मुंबईत पावसाची जोरदार हजेरी लागेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सूर्यास्तापर्यंत केवळ ढगांची दाटीच झाली. रात्री मात्र मान्सूनधारांनी जोरदार सलामी देत मुंबई व उपनगराला चिंब भिजवून टाकले.
मागील आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत जोरदार बॅटिंग सुरू असतानाच मुंबईकरांना प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर सोमवारी मुंबईत दाखल झाला. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मान्सून मुंबईत दाखल झाल्याची माहिती दिली. मंगळवारसह बुधवारी मुंबईचे आकाश अंशत: ढगाळ राहील. शहरासह उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
सर्वदूर मान्सूनधारा : पेरण्यांची लगबग सुरू
मुंबई/पुणे : कोकण किनारपट्टीवरून घाटमाथ्यावर आलेल्या मान्सूनची दोन दिवसांत दमदार वाटचाल झाली असून मऱ्हाटी मुलुखात सर्वदूर पाऊस बरसू
लागला आहे. सोमवारी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. सोलापूर शहर तर जलमय झाले आहे.
मराठवाड्यात वीज पडून सात महिलांचा तर विदर्भात तिघांचा मृत्यू झाला.
मान्सूनने सोमवारी मध्य अरबी समुद्र, कोकणचा आणखी काही भाग, उत्तर
अरबी समुद्र, वलसाडसह गुजरातचा काही भागात, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमेचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा आणखी काही भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भागात प्रवेश केला़
13 जून : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल.
14 जून : गोवा, कोकणात
बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.
15, 16 जून : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल.