मुंबईत मान्सून दाखल, 48 तासात मुसळधारचा इशारा
By admin | Published: June 12, 2017 12:36 PM2017-06-12T12:36:10+5:302017-06-12T13:33:45+5:30
सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईत आज मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईत आज मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली. येत्या 48 ते 72 तासांमध्ये मुंबई शहर, उपनगर आणि सागरी किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा इसारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उपनगरात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
याशिवाय, कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा जरी मान्सून कोकणासह गोव्यात दाखल झाला असला तरी गेल्या आठवड्यात तीन दिवस जोरदार कोसळल्यानं सगळीकडे पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.
मान्सून अत्यंत सक्रिय असून तीन ते चार ठिकाणी जोरदार वृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर इतर ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी वारे वेगानं अरबी समुद्रात दाखल होत असल्यानं जोरदार अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच मान्सूनसाठीही अत्यंत पोषक वातावरण असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.
सध्याची पूरक स्थिती पाहत कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कर्नाटकाचा अंतर्गत भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्रप्रदेश किनारपट्टी, मध्य आणि उत्तर बंगालचा उपसागर आणि त्रिपुरा, आसाम, मेघालयाचा उर्वरित भागातही पावसानं प्रवेश केला आहे.