Monsoon : मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 06:43 AM2023-06-26T06:43:28+5:302023-06-26T06:43:47+5:30
Mumbai: मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून अधिकृतरित्या मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली.
मुंबई - मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून अधिकृतरित्या मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली. मान्सून मुंबईसोबत दिल्लीतदेखील दाखल झाला असून, सलग लागून राहिलेल्या पावसाने मुंबईला अखेर गारेगार केले आहे. परिणामी मुंबईकरांची उकाड्याच्या तावडीतून सुटका झाली असून आता पुढील काही महिने मुंबईकरांना सरासरी पावसाला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात चांगला पाऊस झाला. विदर्भ तसेच मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, महाराष्ट्राव्यतिरिक्त मान्सून मध्य अरबी समुद्र, उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातचा काही भाग, राजस्थान आणि हरयाणाचा काही भाग, उत्तराखंड हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली. पुढील दोन दिवसांत मान्सून गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरयाणात दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
आंबोलीत वर्षाव
गेले चार दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. पर्यटकांनी धबधब्याखाली जाऊन सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.