मान्सून कोकणात
By admin | Published: June 12, 2014 03:01 AM2014-06-12T03:01:34+5:302014-06-12T03:01:34+5:30
दरमजल करीत पुढे सरकरणारा मान्सून अखेर बुधवारी कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले
मुंबई : दरमजल करीत पुढे सरकरणारा मान्सून अखेर बुधवारी कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून, हा नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र आणि कोकणच्या उर्वरित भागात पुढील २४ तासांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा बुधवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने बुधवारी मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तटीय कर्नाटकाचा उर्वरित भाग आणि संपूर्ण गोव्यासह कोकणचा काही भाग व्यापला आहे. तर मध्य-पूर्व अरबी समुदात असलेले ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘नानौक’ या चक्रीवादळात झाले आहे. याचा परिणाम म्हणून पुढील चोवीस तासांसाठी मुंबईवरील आकाश ढगाळ राहील.
आणि मुंबई शहर आणि उपनगरांत
जोरदार वारे वाहतील, असा इशाराही भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला
आहे.
दरम्यान, विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)