मान्सून कर्नाटकात रेंगाळला; आणखी दोन दिवस प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:07 AM2022-06-06T06:07:02+5:302022-06-06T06:07:30+5:30
राज्यात एकीकडे पूर्वमोसमी पावसाच्या सरी हजेरी लावत असून, विदर्भासह मध्य भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे.
पुणे : केरळमध्ये नेहमीपेक्षा ३ दिवस अगोदर आलेल्या मान्सूनने कर्नाटकापर्यंत वेगाने प्रवास केला. मात्र, त्यानंतर ३१ मेपासून तो कर्नाटकात रेंगाळला असून, पुढील दोन दिवसानंतरच त्याची पुढे वाटचाल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात एकीकडे पूर्वमोसमी पावसाच्या सरी हजेरी लावत असून, विदर्भासह मध्य भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे.
मान्सूनने ३१ मेपर्यंत कर्नाटकातील बंगळूरुपर्यंत मजल मारली होती. आवश्यक ते कमी दाबाचे क्षेत्र तयार नसल्याने त्याची वाटचाल रोखली गेली आणि तो सध्या तेथेच रेंगाळला. येत्या ७ जूनपासून दक्षिण भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात ५ दिवस पावसाचा जोर राहील, तसेच वायव्य आणि मध्य भारताला पुढील २ ते ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.