मान्सूून मुंबईत!
By admin | Published: June 16, 2014 03:41 AM2014-06-16T03:41:12+5:302014-06-16T03:41:12+5:30
नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आज पुणे-मुंबईसह पूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला.
मुंबई/पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आज पुणे-मुंबईसह पूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला. यंदा मान्सूनने येण्यास ८ दिवस उशीर केला. याचबरोबर रविवारी मान्सूनने गुजरातचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीतही ‘एन्ट्री’
केली. पुढील २ ते ३ दिवस मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागात पोहोचण्यास अनुकूल स्थिती नाही, अशी माहिती
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
यंदा मान्सून ३ दिवस उशिरा, १० जूनला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला होता. त्याच काळात अरबी समुद्रात आलेल्या नानौक चक्रीवादळामुळे मान्सूनला महाराष्ट्रात आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थितीच नव्हती. हे चक्रीवादळ आज विरले. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूलता वाढली आणि त्याने महाराष्ट्रासह गुजरातमध्येही आगमन केले. रविवारी दिवसभरात मान्सूनने पूर्ण सांगली जिल्हा, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग व्यापला. पुढील २ ते ३ दिवसात मान्सूनला पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा या राज्यांसह कर्नाटक, आंध ्रप्रदेश, सिक्कीम या राज्यांच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, अशी माहिती डॉ. खोले यांनी दिली.
कर्नाटक, तामिळनाडू, ईशान्येकडील राज्ये या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात इम्फाळमध्ये १२० मिमी, जबलपूरमध्ये ८०, पणजीमध्ये ७०, वेंगुर्ल्यात ६०, कारवार, पोरबंदर येथे ५०, अलिबागमध्ये ३०, रायपूर, मेंगलोर, मुंबई, कोलकाता, कार-निकोबार बेटांवर २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)