Monsoon News: परतीचा पाऊस वेशीवर, दोन दिवस जोर‘धार’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:29 AM2021-10-11T07:29:36+5:302021-10-11T07:30:35+5:30
Monsoon News: राजस्थानातून परतीच्या वाटेवर निघालेल्या मान्सूनचा मुक्काम रविवारीदेखील गुजरात, मध्य प्रदेशात नोंदविण्यात आला असून, वेशीवर असलेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे.
मुंबई : राजस्थानातून परतीच्या वाटेवर निघालेल्या मान्सूनचा मुक्काम रविवारीदेखील गुजरात, मध्य प्रदेशात नोंदविण्यात आला असून, वेशीवर असलेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, याचा परिणाम म्हणून सोमवार आणि मंगळवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यताही वर्तविली आहे.
कुठे, किती तीव्रता राहणार?
११ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. विदर्भात
मात्र हवामान कोरडे राहील.
१२ ऑक्टोबर : कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भात हवामान कोरडे राहील.
१३ आणि १४ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल.
पुणे, नगरमध्ये तासात विक्रमी पाऊस
-पुणे शहरात शनिवारी सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस पडला. ऑक्टोबर महिन्यात जितका पाऊस होतो, तेवढा एकाच दिवसात पडला.
-अहमदनगर शहर व परिसरात शनिवारी ४० मिनिटांत ८० मिमी पाऊस पाऊस झाला. नेवासा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर राहुरी तालुक्यात वीज पडून दोघे जखमी झाले.
-भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.