मान्सूनचा अंदाज चेष्टेचा विषय नाही !
By admin | Published: June 18, 2017 01:17 AM2017-06-18T01:17:30+5:302017-06-18T01:18:09+5:30
जागर---रविवार विशेष
आशिया खंडाच्या मध्य भागात आणि भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये तापमान जास्त असते. यामुळे मध्य आशियात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. याच काळात हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर हवेचा दाब जास्त असतो. यामुळे या समुद्री भागाकडून भारतीय उपखंडाकडे वारे वाहू लागतात. हे वारे नैर्ऋत्येकडून इशान्येकडे वाहतात. म्हणून त्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे समुद्रांवरून प्रचंड प्रमाणात आर्द्रता वाहून आणतात. त्यापासून जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण भारतात पाऊस पडतो. शेतीचा खरीप हंगाम हा पूर्णत: याच पावसावर अवलंबून असतो. मान्सूनचा अंदाज हा १६ घटकांवर अवलंबून आहे. त्यांचा अचूक अंदाज व्यक्त करणे कठीण काम आहे. मान्सून हा आपल्याला लाभलेले वरदान आहे. यातून मिळणाऱ्या पावसाचा यथायोग्य वापर करणे आपल्याच हातात आहे.
भारतीय उपखंडाची जीवनशैली ही नैर्ऋत्य मान्सूनची आहे. पाऊस-पाण्याच्या स्थितीवर जीवनाच्या प्रत्येक अंगाला भिडणाऱ्या घटकांशी संबंध आहे. भारतीय उपखंडातली कृषक समाज संस्कृतीसुद्धा अनेक वर्षाच्या प्रवासातून घडली आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून कधी येणार आणि किती येणार याचा अंदाज फार महत्त्वाचा आहे. त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, मान्सूनचा अचूक अंदाज बांधणे आवाक्याबाहेरची गोष्ट राहते. परिणामी, भारतीय हवामान खाते जेव्हा मे महिन्याच्या अखेरीस अंदाज व्यक्त करते, तेव्हा अनेकजण चेष्टेचा विषय ठरवितात. इतका सोपा आणि सरळ हा विषय नाही. ते एक पृथ्वीतलावावरचे मोठे नैसर्गिक चक्र आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. ते मनोरंजक आहे. अद्भूत आहे आणि म्हटले तर निसर्गाचा चमत्कारही आहे.
पृथ्वी ही प्रामुख्याने दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागलेली आहे. उत्तरेत मोठे भूखंड म्हणजे जमिनीचा खंड आहे. दक्षिणेत महासागर पसरलेले आहेत. उन्हाळ्यात तापलेल्या उत्तरेतील भूखंडावरील हवा तापते. त्याचवेळी दक्षिण गोलार्धातील महासागरही तापतात. तेथील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत राहते. उत्तरेतील हवा तापून निर्माण झालेल्या पोकळीमुळे दक्षिणेकडून वारे वाहू लागतात. ते दक्षिणेतील हवेतील बाष्प घेऊनच येऊ लागतात. ज्या महासागराच्या तिन्ही बाजूने जमीन आहे, अशा भूखंडाकडे ते वारे वाहतात, त्यालाच मोसमी वारे म्हटले जाते. तो मान्सूनचा वारा समुद्राकडून जमिनीकडे वाहत राहतो. हाच आपला मान्सून आहे. हिंदी महासागरात तयार झालेला हा बाष्पीयुक्त मान्सून नैर्ऋत्येकडून केरळमार्गे भारतावर चालून येतो. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात तयार झालेला मान्सून आशिया खंडातील अनेक देशांपर्यंत धावत येतो. अशा प्रकारचा मान्सून आॅस्ट्रेलिया, चीन किंवा आफ्रिका खंडाच्या भोवतीही निर्माण होतो. आशिया खंडातील भारतासह अनेक देशांना जो मान्सूनचा पाऊस ओलाचिंब करतो तो मेमध्ये तापलेल्या जमिनीचा परिणाम असतो. भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूच्या समुद्राने वेढला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याने येणारा पाऊस केरळ मार्गे आत शिरतो. बंगालकडून येणारा पाऊस ईशान्येकडील राज्यातून भारतात येतो म्हणून केरळमधील मालगुडी आणि ईशान्येकडील चेरापुंजी ही केंद्रे अतिप्रचंड पावसाची म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येतात. दरवर्षी मान्सूनचे आगमन झाले की, या दोन्ही गावांची आठवण येते.
नैर्ऋत्येकडून केरळमार्गे आलेला पाऊस पश्चिम घाटाच्या उंच-उंच डोंगरांना धडकतो. परिणामी, कोकणपट्ट्यात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत राहते. त्यापैकी बराच पाऊस या डोंगरमाथ्यावर होत राहतो. तेथील भौगोलिक रचनेनुसार बरेच पाणी अरबी समुद्राकडे पश्चिमेकडे वाहत जाते. तर अनेक ठिकाणी उदा. आंबोली, महाबळेश्वर, भीमाशंकर, हरिश्चंद्रगड येथे कोसळणारा मान्सून मोठ-मोठ्या नद्यांना जन्म देऊन जातो. कृष्णा, गोदावरी, आदी नद्यांची खोरी याच पश्चिम घाटात कोसळणाऱ्या महाकाय पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झाली आहेत. या दोन्ही नद्यांना मिळणाऱ्या खोऱ्यातील असंख्य नद्यांचा उगमही याच नैर्ऋत्य मान्सून पावसाने केला आहे. तुंग आणि भद्रा, कावेरी, मलप्रभा, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, वारणा, कोयना, उरमोडी, तारळी, कृष्णा, नीरा, भीमा, घोडनदी, कुकडी, प्रवरा आणि गोदावरी अशा असंख्य नद्यांचा जन्मच या मोसमी वाऱ्यामुळे येणाऱ्या मान्सून पावसाच्या उदरात दडलेला आहे. हा पाऊस केरळ, तमिळनाडूच्या किनारपट्टीसह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कोकणातून पुणे, मुंबई मार्गे गुजरातपर्यंत जातो. विंध्य पर्वतरांगांना धडकून विदर्भ, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात कोसळत जातो.
या उलट बंगालच्या उपसागरातून येणारा मोसमी वाऱ्यातील पाऊस (मान्सून ) ईशान्येकडून हिमालयाला जाऊन धडकतो. हिमालयाने आडवी भिंतच निर्माण केल्याने बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, उत्तर प्रदेश, दिल्लीपासून राजस्थानपर्यंत हा पाऊस पसरतो. मान्सूनची ही भारतीय उपखंडात दोन्ही बाजूने चढाओढच असते. राजस्थानचा पश्चिम भाग असलेल्या थरच्या वाळवंटाचा भाग तेवढा कोरडाच राहतो. मान्सूनचा हा शापच म्हणायला हरकत नाही. कारण राजस्थानचा भूभाग कडक उन्हाळ्यात सर्वाधिक तापतो. त्याच कडक उन्हाळ्याने तापलेल्या जमिनीवरील हवा मोसमी वारे निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात; पण त्या राजस्थानमध्ये सर्वांत कमी पाऊस पोहोचतो.
इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी ही निसर्गाची प्रक्रिया महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कर्नाटकातील विजापूर, रायचूर, गदग, बिदर, कोलार, चित्रदुर्ग, आदी भागांतील मोठा प्रदेश मान्सूनविना कोरडाच राहतो. पश्चिम घाटामुळे मान्सून आडतो तेथे कोसळतो. असंख्य नद्यांना जन्मही देतो; पण दीड-दोनशे किलोमीटरवरील या मोठ्या पट्ट्यात कमीत कमी पाऊस पडतो. याला आपण कायमचा दुष्काळीपट्टा म्हणतो. जेव्हा रब्बी हंगामानंतर आॅक्टोबरच्या उन्हाच्या तडाख्याने जमीन तापते तेव्हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पूर्वेकडून वारे वाहतात. ते काही प्रमाणात पाऊस आणून मान्सूनचा प्रवास संपवितात. पुढे थंडीचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याने पुढील वर्षाच्या मान्सूनची तयारी सुरू होते.
आता या मान्सूनचा अंदाज बांधायचा कसा? हा अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांना पडलेला प्रश्न आहे. ब्रिटिशांच्या आगमनापासून पंचांगकर्त्यांपर्यंत असंख्य शहाण्या माणसांनी या मान्सूनचा अंदाज बांधण्याचा अनेक वर्षे प्रयत्न केला. मान्सूनचा अंदाज हा सोळा घटकांवर अवलंबून आहे. त्यांचा सखोल अभ्यास करणारी प्रणाली ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटाने तयार केली. त्यापैकी सहा घटक तापमानाशी निगडित आहेत. पाच घटक तापमानामुळे निर्माण झालेल्या हवेतील दाबाशी निगडित आहेत. तीन घटक वाऱ्याच्या रचनेशी, तर दोन घटक हिमालयाच्या हवामानाशी संबंधित आहेत, असे त्यांचे मत होते. या सोळा घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करून मान्सूनच्या कमी-अधिक शक्यतेचा अंदाज बांधावा लागतो. त्यात अलीकडे ‘एलनिनो’ या दक्षिण अमेरिकेच्या उपखंडातील तापमानामुळे निर्माण झालेल्या घटकाची भर पडली आहे, असे भारतातील हवामानतज्ज्ञ मानतात. त्यामुळे दरवर्षी ७ जूनला येणारा मान्सून कधी पुढे मागे करतो. त्याचे कारण हा इतका प्रचंड प्रदेशातील सोळा घटकांतील बदलांवर अवलंबून आहे. त्यामुळे आपण मान्सूनच्या अंदाजाचा कितीही चेष्टेचा विषय केला तरी त्याचा अचूक अंदाज किंवा एक अधिक एक दोन असे उत्तर देता येत नाही. किंबहुना इतक्या तापमानाला इतकी हवा, जमीन तापेल आणि त्याचा परिणाम महासागरावरील वारे निर्माण करण्यावर होईल, असे ठाम सांगता येत नाही, हीच तर नैसर्गिक चमत्काराची गोष्ट आहे. कारण याचा व्याप आणि विस्तार प्रचंड आहे; पण मान्सून हा एक वरदानच लाभलेला आहे. त्यातून मिळणाऱ्या पाण्याचा यथायोग्य वापर करणे, त्याचे प्रदूषण टाळणे अािण भावी पिढीसाठी जतन करणे, हे आपल्या हातात आहे. तेवढे केले तरी मान्सून दरवर्षी येत राहील. त्याचा समाजजीवनातील आनंद टिकविण्याची जबाबदारी आपली आहे. या मान्सूनवरच नद्यांचा जन्म आहे, त्यांचा नाश करण्याचा अधिकार आपणास नाही.
- वसंत भोसले..