मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:20 AM2018-06-10T05:20:07+5:302018-06-10T05:20:07+5:30
नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी जोरदार वाटचाल करीत अर्धा महाराष्ट्र व्यापला असून कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मराठवाड्यातही धुवांधार पाऊस झाला.
मुंबई/पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी जोरदार वाटचाल करीत अर्धा महाराष्ट्र व्यापला असून कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मराठवाड्यातही धुवांधार पाऊस झाला. येत्या चार दिवसांत कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़
मान्सूनने राज्यात अहमदनगर, परभणी, यवतमाळ, ब्रम्हपुरी तसेच राजनंदगाव, भावानीपटणी, पुरी येथपर्यंत मजल मारली आहे़ येत्या ४८ तासांत महाराष्ट्र, छत्तीसगडचा आणखी काही भाग, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, बंगालच्या उपसागरातील उर्वरित भाग तसेच ईशान्यकडील राज्यांमध्ये मॉन्सून पोहचण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़
मालवण तालुक्यात विक्रमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता.
विदर्भातही जोरदार!
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद
झाली. माळहिवरा, बासंबा, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वसमत, कुरुंदा, हयातनगर परिसरात धो-धो पाऊस पडला.
परभणी जिल्ह्यातही सर्वदूर जोरदार
पाऊस झाला. पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. औसा, निलंगा, देवणी, रेणापूर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. शिरूर अनंतपाळ ते नागेवाडी रस्त्यावर घरणी नदीवर असलेल्या छोट्या पुलावरुन वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात पडल्याने प्रकाश सोमनाथ जळकोटे यांचा मृत्यू झाला. रेणापूरातही एकजण वाहून गेला
तर औसा तालुक्यात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला.
विदर्भात मंगरुळपीर, कारंजा, वाशिम, मालेगाव, नारखेडा, आर्वी, रिसोद, पुसद, यवतमाळ, अरणी, नंदगाव काजी, परतवाडा, अकोला, बाभूळगाव, वर्धा येथे पाऊस झाला़
घाटमाथ्यावरी लोणावळा, भिरा, वळवण, ताम्हिणी, धारावी, डुंगरवाडी, कोयना (पोफळी), भिवपुरी, खंद, शिरोटा, खोपोली आदी ठिकाणी दमदार सरी बरसल्या.
पावसाने बुडाली खेळणी: सोलापूर शहरात पडणाºया पावसाने सात रस्ता परिसरातील चिल्ड्रन पार्कमध्ये पाणी साठले आहे.
मालवण शहर आणि परिसरात ठिकठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडित झाला होता.