अंधविश्वासू पर्यटकांकडून राणीबागेत अजगरावर पैशांचा पाऊस
By admin | Published: May 14, 2017 01:32 AM2017-05-14T01:32:30+5:302017-05-14T01:32:30+5:30
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पहायला मिळत आहे.
अक्षय चोरगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २१ व्या शतकात विज्ञान युगाचा बोलबाला असतानासुद्धा काही नागरिकांच्या मनात खोलवर रूजलेल्या अंधश्रद्धा मात्र अद्यापही कमी झाल्या नसल्याचे उदाहरण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पहायला मिळत आहे. प्राणीसंग्रहालयातील अजगरावर दररोज येणाऱ्या पर्यटकांकडून पैसे फेकले जात असल्याचे पहायला मिळत आहे. काहीतरी शुभ वार्ता मिळेल, शुभ शकून होईल, अशी भोळी अंधश्रद्धा मनात ठेवून पर्यटक अजगरावर एक, दोन, पाच आणि दहा रूपयांची नाणी फेकत आहेत. फेकलेले नाणे जर अजगराच्या अंगावर पडले तर शुभवार्ता मिळणारच असा गैरसमज पर्यटकांनी करून घेतला आहे. केअर टेकर नसल्याने ही प्रथा रोखण्यात प्रशासनाला अपयश मिळत आहे. तर काही वेळा केअर टेकरची नजर चूकवून पर्यटक नाणी फेकतात. अशा अंधश्रद्धांना थांबविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. असे प्राणीमित्रांनी नमूद केले. राणीच्या बागेत विविध प्राणी आहेत त्यामध्ये अजगर सुद्धा आहेत. अनेक प्राण्यांसाठी केअरटेकर नसल्यामुळे प्राणीमित्रांमध्ये संतापाचे वातावरण पहायला मिळत आहे. केअरटेकर नसल्यामुळेच पर्यटक अशा गोष्टी करत आहेत. प्रशासनाने सर्व पिंजऱ्यांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर नेमावा. आणि अशा अंधश्रद्धा रोखण्यासाठी पुढाकार घेवून काम करावे, असे प्राणी मित्र संघटनांचे म्हणणे आहे.
ते पैसे कोणाच्या घशात?
गर्दीच्या दिवशी अजगराच्या पिंजऱ्यात पर्यटकाकडून टाकल्या जाणाऱ्या नाण्याचा हिशोब ठेवला जात नाही. ज्यावेळी पिंजऱ्याची सफाई केली जाते त्यावेळी ही रोकड काढली जाते मात्र ती उद्यान विभागाकडे जमा केली जात नाही. सफाई कर्मचारी ते पैसे घेत असावेत, असा कयास आहे, असे उद्यान विभागाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
उद्यानात अजगरासाठी स्वतंत्र पिंजरा व गुहा असून त्याच्या देखभालीसाठी प्रशिक्षीत कर्मचारी तैनात असतो. मात्र काही वेळा पर्यटक त्याची नजर चूकवून अजगराच्या दिशेने पैसे फेकतात. परंतु गुहेमुळे ती नाणी अजगराला लागत नाहीत.
- संजय त्रिपाठी (संचालक, वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणीसंग्रहालय)
पालिका प्रशासनाने सेल्फी पॉर्इंट साठी पैसे खर्च केले, परंतु राणीबागेतील प्राण्यांसाठी असलेले पिंजरे अद्ययावत करणे, प्राण्यांसाठी केअरटेकर नेमने या गोष्टींना दुय्यम स्थान दिले आहे. प्रशासनाने प्राण्यांच्या देखभालीकडेसुद्धा लक्ष द्यावे.
- सुनिश कुंजू, (सचिव,
प्लान्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी)
राणीबागेत केअर टेकर खूपच कमी आहेत. सापांसाठी, अजगरांसाठी सर्पोद्यानातून प्रशिक्षण घेतलेले केअरटेकर असावेत. केअर टेकर वाढवले तर नाणी टाकन्यासारख्या अंधश्रद्धा नक्कीच कमी होतील.
- विजय अवसरे, निसर्गमित्र
भारत सध्या मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतोय. तरिही भारतीयांच्या मनात खोलवर रूजलेल्या अंधश्रद्धांचा विनाश होत नाही. अजगरावर नाणी फेकण्यासाख्या प्रथा थांबविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
- गोविंद काजरोळकर, अंनिस कार्यकर्ता